राज्यातील पहिले करिअर गाईडन्स कॉन्सिलिंग सेंटर
अमरावतीला स्थापन
जिल्हाधिकारी किरण गित्ते
* 29 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन होणार
* टाटा ट्रस्टतर्फे 10 हजार बेरोजगारांचे कौशल्य विकसित करणार
* फ्युअल टिम अमरावतीका हुनर शोधणार

अमरावती, दि. 26 (जिमाका) : राज्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ स्थानिकरित्या उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा टाटा ट्रस्ट सोबत सामंजस्य करार झाला असुन राज्यातील 30 जिल्ह्यात करिअर गाईडन्स कॉन्सिलिंग सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या केंद्राद्वारे शासनाच्या महाकौशल्य कार्यक्रमांतर्गत व्यवसाय शिक्षण, मागणी प्रमाणे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्यातील पहिले करिअर गाईडन्स कॉन्सिलिंग सेंटर अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्थापन झाले आहे. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि.29 डिसेंबर, 16 रोजी नियोजन भवनात या केंद्राचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक महेश देशपांडे, सहाय्यक संचालक अशोक पाईकराव, फ्युअल सामाजिक संस्थेचे केतन देशपांडे, एमआयडीसीचे किरण पातुरकर तसेच पत्रकार उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले की, या केंद्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 2 हजार चौरस फुट जागा देण्यात आली असुन टाटा ट्रस्टच्या वतीने फ्युअल (फ्रेन्डस् युनियन फॉर इनरजेटिक लाईफ) सामाजिक संस्था वर्षभरात 10 हजार बेरोजगारांना मार्गदर्शन करणार आहे. अमरावती जिल्ह्यातील उद्योग, टेक्स्टाईल पार्क तसेच व्यापारी आस्थापनांना कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची गरज आहे त्याची कौशल्य विकास विभागाशी लिंक करुन प्रत्येक उमेदवारास आधार नंबर देवून स्वावलंबी होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार आहे. फ्युअल सामाजिक संस्थेने यापुर्वी ठाण्यामध्ये प्रायोगिक तत्वावर उत्कृष्ट काम केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, सुमारे 80 टक्के पदविधारक बेरोजगार आहेत. त्यांची गुणवत्ता बघून या केंद्रातर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शासनाच्या कौशल्य विकास विभागातील कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या त्रुटी भरुन काढण्यासाठी टाटा ट्रस्टला कार्यक्रम देण्यात आला आहे. अमरावती येथे यापुर्वी घेण्यात आलेल्या महाकौशल्य विकास रोजगार मेळाव्यातुन 4 हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. शासनाकडे डाटाबेस उपलब्ध आहे. फ्युअल सामाजिक संस्थेकडून यावर्षी 10 हजार सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकासाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या संस्थेकडून शास्त्रीय दृष्टीकोन समोर ठेवून कौशल्य विकासाचे मागर्दशन करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्टची राज्यात मॉडल एम्प्लॉयर म्हणून ओळख आहे त्यामुळे नजिकच्या काळात कुशल मनुष्यबळाची गरज पुर्ण होईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.  

फ्युअल सामाजिक संस्थेचे प्रमुख केतन देशपांडे म्हणाले, राज्यात विविध उद्योग व संस्थांकडून शिष्यवृत्ती देण्यात येतात. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या संधी, कौशल्य पुर्ण शिक्षणाचा मार्ग, ज्यांनी कौशल्य पुर्ण केले आहे त्यांना नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या संस्थेकडून आतापर्यंत 5 लाखावर युवक-युवतींना मार्गदर्शन केले आहे. दि.29 डिसेंबर, 16 रोजी अमरावती जिल्ह्यातील 200 महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्राचार्यांशी चर्चा करुन फ्युअल सामाजिक संस्थेची टीम प्रत्येक महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांची स्किल मॅपिंग टेस्ट घेवून त्यांना मार्गदर्शन करेल. या संस्थेतर्फे 10 युवक-युवतींची शिष्यवृत्ती देण्यासाठी निवड करण्यात आली असुन मुख्यमंत्री महोदयांच्याहस्ते शिष्यवृत्त्या देण्याचा मानस व्यक्त केला. पुढील वर्षभर या केंद्राद्वारे विविध उपक्रम चालणार असुन केंद्रासह विविध शाळा महाविद्यालयामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

देशपांडे पुढे म्हणाले की, फ्युअल सामाजिक संस्थेमध्ये अमरावती शहरासाठी 19 तज्ज्ञांची टीम असुन या टिमद्वारे प्रत्येक शाळा-महाविद्यालयातील अमरावतीका हुनर शोधण्याच काम करेल. यासाठी दोन फिरते वाहन आहे याद्वारे वर्षभर बेरोजगारांना समुपदेशनाचे काम करु.  

एमआयडीसीचे किरण पातुरकर म्हणाले, अमरावती विद्यापिठात टेक्स्टाईल पार्कसाठी विविध 13 कोर्सेस डिझाईन करण्यात आले आहेत. अमरावती एमआयडीसीमध्ये सद्यस्थितीत 300 ते 400 कुशल मनुष्यबळाची गरज आहे. नांदगाव पेठ येथे 5 उद्योगाचे काम चालू आहे. नजिकच्या काळात 3 हजारावर लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कृषि व्यवस्थापक ही नवीन संकल्पना सुरु झाली असुन हा कोर्स ही विद्यापिठात सुरु करण्याबाबत प्रयत्न सुरु आहे.   
00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती