महाराष्ट्रातील पहिल्या बांबु उद्यानाचे
पालकमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण
* नवीन वर्षात नागरिकांना भेट
        अमरावती, दि.1 (जिमाका) : मध्यवर्ती रोप वाटिकेतील वडाळी बांबु उद्यानाचे लोकार्पण आज पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले. महाराष्ट्रातील पहिले बांबु उद्यान आज अमरावतीकरांसाठी खुले झाले आहे, या उद्यानातच कॅक्टस उद्यान सुद्धा आहे. हे उद्यान नवीन वर्षानिमित्त नागरिकांना भेट असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
            यावेळी व्यासपिठावर नगरसेविका सपना ठाकुर, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक मसराम उपस्थित होते.
            महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व देखणे असलेले 49 हेक्टरमधील उभारलेल हे बांबु उद्यान अमरावतीच्या वैभवात भर टाकणार आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, बांबु प्रजातीच्या संवर्धन, संगोपनासह बांबु शेतीपूरक व्यवसाय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पर्यावरण राज्यमंत्री म्हणून काम करत असतांना गेल्या दोन वर्षात शासनातर्फे मोठ्या प्रमाणावर होणारे वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमामुळे निसर्ग संरक्षणाकडे ठोस पाऊले टाकली जात आहे. बांबु व्यवसाय सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीकडे नेणारा ठरू शकतो. या वडाळी गार्डनसाठी काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. तत्कालिन उप वनसंरक्षक निनू सोमराज यांचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.     
            यावेळी प्रास्ताविकात उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना म्हणाले की, बांबु गार्डन निर्मितीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून दिड कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. पालकमंत्र्याच्या व प्रशासनाच्या सहकार्यामुळे बांबु गार्डन आज अमरावतीकरांच्या साठी खुले करण्यात येत आहे. चिमुकल्यांसाठी बाल उद्यान त्यासोबतच बांबु पुल, वनचेतना केंद्र, नक्षत्र वन हे सगळ बांबु वनामध्ये पाहायला मिळणार आहे. यासाठी प्रती व्यक्ती 10 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यावेळेस त्यांनी बांबु उद्यानाच्या उद्देश ही विशद केले.   
            यावेळी कॅक्टस गार्डनसाठी कॅक्टस गार्डन विकसित करणारे श्री.राऊत, बांबु गार्डनसाठी ज्यांनी अहोरात्र श्रम घेतले असे सैय्यद शेख सलीम, वन परिक्षेत्र अधिकारी एच.व्ही.पडगव्हाणकर यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना मुख्य वनसंरक्षक यांनी बांबुला शेतीपूरक व्यवसाय म्हणून स्विकारण्याची गरज असल्याचे आवाहन अशासकीय संस्थांना केले. बांबु गार्डनच्या लोकार्पणाचा हा क्षण आनंदाचा असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन यादव तरटे पाटील यांनी केले. कार्यक्रमाला अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, वनअधिकारी, वन्यजीव प्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांबु वन उद्यानाची वैशिष्टे
·        63 विविध प्रजातीचे बांबु रोप वन एकूण 18 हेक्टर क्षेत्रामध्ये.
·        राज्यातील सर्वात मोठे बांबु संकलन केंद्र
·        बांबु पुल, बांबु हट, बांबु वन माहिती केंद्र, कॅक्टस गार्डन, कमळ उद्यान, बांबु गुफा, बाल उद्यान यासह देश विदेशातुन आणलेल्या विहित प्रजाती संशोधकांना उपयुक्त
00000

वाघ/गावंडे/दि.1-1-2017/15-09  वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती