13 कोटी वृक्षारोपण मोहिमेचा आज शुभारंभ
पालकमंत्र्यांनी घेतला मोहिमेचा आढावा

अमरावती, दि.30: शासनाच्या 13 कोटी वृक्षारोपण मोहिमेसाठी महाराष्ट्र  सुसज्ज झाला असून हरित महाराष्ट्रासाठी मोहिम महत्वाचे पाऊल ठरेल. सर्व विभागांनी मोहिमेदरम्यान समन्वय ठेवून अधिकाधिक लोकसहभाग मिळवत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यात मोहिमेचा शुभारंभ उद्या 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मोहिमेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, महापालिका आयुक्त्‍ संजय निपाने, उपवनसंरक्षक हेमंत मीना आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात यंदा वन विभागाकडून 8 लाख 50 हजार, सामाजिक वनीकरणाकडून 5 लाख, ग्रामपंचायतींकडून 9 लाख 6 हजार व विविध विभागांकडून 3 लाख 44 हजार अशा  26 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याहून अधिक खड्डे व विविध प्रजातींची रोपे तयार आहेत. हरित सेनेंतर्गत सुमारे पावणेदोन लाखाहून अधिक सदस्यांची नोंदणी झाली आहे. पालकमंत्र्यांनी यावेळी विविध विभागांच्या कामांचा स्वतंत्र आढावा घेतला. ते म्हणाले की, झाडे लावण्याबरोबरच सर्व झाडे जगणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. मोहिमेदरम्यान अधिकाधिक लोकसहभागासाठी पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.  
विविध प्रजातींची रोपे
मोहिमेदरम्यान कडुनिंब, बांबू, आवळा, पिंपळ, चिंच, सीताफळ, बेहडा, साग आदी विविध प्रजातींची 45 लाखांहून अधिक रोपे तयार आहेत. खासगी शेतकऱ्यांच्या बांधांवर शेवगा, कढीपत्ता, औषधी वनस्पती आदी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आहे.   ‘नरेगा’अंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यात येत आहे. ‘जिओ टॅगिंग’मुळे प्रत्येक खड्ड्याची, झाडाची नोंद व तपासणी ठेवता येणे शक्य आहे. 
नदीच्या दोन्ही काठांपासून एक किलोमीटर रूंदीत उपलब्ध क्षेत्रात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. काशी, सापन, भुलेश्वरी, शहानूर, शक्ती, चुडामणी, देवना, सापन, बेंबळा, गडगा आदी नद्यांच्या क्षेत्रात वृक्षलागवड होणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती