१३ कोटी वृक्षलागवडीसाठी महाराष्ट्र सज्ज
अभियानाच्या यशस्वितेसाठी अधिकाधिक लोकसहभाग मिळवावा
-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
 अमरावती, दि. १८ : राज्यात  १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, ते पूर्ण होण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग मिळवून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
अभियानात झालेल्या विविध जिल्ह्यांचा कामाचा,तसेच  मुद्रा बँक योजनेचा मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी मंत्रालयात वन सचिव विकास खारगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, तसेच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्त संजय निपाणे, जिल्हा उपवनसंरक्षक हेमंत मीना, उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, सामाजिक वनीकरण उपसंचालक प्रदीप मसराम, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह अनेक अधिकारी  सहभागी झाले होते.
सर्व विभागांनी वृक्ष लागवड कार्यक्रमात समन्वय ठेवून पर्यावरण रक्षणाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन वनमंत्र्यांनी केले. ते म्हणाले की,  रानमळाच्या धर्तीवर वृक्ष लागवडीचा नवा पायंडा राज्यात राबविण्यात येत आहे. जगातील सर्वात  मोठी 51 लाखांची हरितसेना निर्माण होऊ शकली.  फळझाड लागवडीतून, बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाची पर्यायी साधने  ही उपलब्ध करुन देता येतील. त्यादृष्टीने ही वृक्षलागवडीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. जन्म, विवाह आदी संस्मरणीय प्रसंगांनिमित्त नागरिकांना वृक्षवाटप करुन झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. अशा अनेकविध उपक्रमांतून सर्व विभागांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे.  
राज्यात सध्या 13 कोटी वृक्ष गवडीसाठी 24 कोटी 67 लाख रोपे उपलब्ध आहेत,  प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा वन अधिकाऱ्याच्या कार्यालयात माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यांच्याकडे जाऊन वृक्ष लावणाऱ्यांनी आपली माहिती नोंदवावी. वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या वृक्ष लागवडीची नोंद वन विभागाकडे करता यावी यासाठी माय प्लांट” नावाचे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे, असे श्री. खारगे यांनी सांगितले.
                         

 
वन से धन तक
 राष्ट्रीय स्तरावर यंदा प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचे तीन लक्ष कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात महाराष्ट्राचा वाटा 50 हजार कोटी रुपयांचा राहणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत अधिकाधिक गरजूंचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करावेत. मुद्रा अंतर्गत दिलेले उद्दिष्ट सर्व बँकांनी पूर्ण करावे. तसेच या योजनेच्या सर्व छोट्या छोट्या घटकांची माहिती जाणून त्याचे पुरेपूर पालन करावे. मुद्रा आणि वृक्षलागवडीची योजना ‘वन से धन तक’ या संकल्पनेतून राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. 
जिल्ह्यात ४५ लाख रोपे तयार
 अमरावती जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, वनविभागाकडून साडेआठ लाख, सामाजिक वनीकरणाकडून पाच लाख, तर गावोगावी ग्रामपंचायतींकडून ९ लाखांहून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. ४५ लाख रोपे तयार आहेत. हरित सेनेची १ लाख ६९ हजार इतकी नोंदणी झाली आहे, अशी माहिती श्री. परदेशी यांनी दिली.
  घरकुल योजनेत लाभार्थींना त्यांच्या जागेत वृक्षभेट देऊन वृक्षारोपणाचे आवाहन करण्यात येईल, असे श्रीमती खत्री यांनी सांगितले.  

                                                00000                   

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती