Saturday, June 9, 2018


राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना मिळणार गती
कॅनडा व अमेरिकेच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री रवाना

          मुंबई, दि. 9:  राज्यातील पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम - प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा व अमेरिकेच्या दौऱ्यावर आज रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ॲमेझॉन या नामांकीत समुहातर्फे मुख्यमंत्र्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
            या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ कॅनडातील मॉन्ट्रीयल तसेच अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि सॅनफ्रान्सिस्को या शहरांना भेटी देऊन विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांशी चर्चा करणार आहेत. या संपूर्ण दौऱ्यात राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत संबंधित क्षेत्रातील संस्था-उद्योग समुहांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे दरम्यान अतिवेगवान रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी व्हर्जिन हायपरलूप या समुहाशी राज्य सरकारने करार केला होता. या कराराच्या पुढील टप्प्यात सॅन फ्रान्सिस्को येथील व्हर्जिन हायपरलूपच्या ट्रायल सेंटरला राज्याचे शिष्टमंडळ भेट देणार असून पुढील आराखड्याबाबत या समुहाशी चर्चादेखील केली जाणार आहे.
            कॅनडातील मॉन्ट्रीयल शहराच्या भेटीदरम्यान आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि त्या अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांबाबत तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडो यांच्या निमंत्रणावरुन ही भेट होत आहे. मॉन्ट्रीयल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जगातील आघाडीचे केंद्र आहे. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा राज्याचा निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान हे कृषीसह इतर क्षेत्रात मोठी भूमिका बजावणार आहे. या तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र मुंबईत उभारण्याबाबत कॅनडा सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यादरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार आहे.
            वॉशिंग्टन डी.सी. व न्यूयॉर्क शहरात आयोजित अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारीसंदर्भातील चर्चासत्रात मुख्यमंत्री विविध मान्यवरांशी संवाद साधतील. अमेरिकेतील आघाडीच्या उद्योगसमुहांकडून राज्यात करावयाच्या गुंतवणुकीबाबतही मुख्यमंत्री संबंधितांशी  चर्चा करणार आहेत. यामध्ये जागतिक बँक, गुगल, ॲपल, इंटेल, फोर्ड, ओरॅकल, सिमॅन्टेक, सिस्को इत्यादींचा समावेश आहे. राज्यातील महत्त्वाच्या उपक्रमांबाबत काही समुहांशी परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करारही यावेळी होणार आहेत.
            यादरम्यान न्यूयॉर्क येथे ॲमेझॉन समुहातर्फे लोककल्याणासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगाबद्दल मुख्यमंत्र्यांचा विशेष  पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
            या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे  (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास आदी सहभागी झाले आहेत.
000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...