Monday, June 25, 2018

दूध उत्पादनात सर्वाधिक प्रगती करणारे राज्य ‘महाराष्ट्र’ ठरले
इंडिया टूडे ॲग्रो समीटमध्ये महाराष्ट्राचा गौरव
नवी दिल्ली दि. 23 : देशभरातील राज्यांमध्ये ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत दूध उत्पादनात सर्वाधिक प्रगती करणारे राज्य ‘महाराष्ट्र’ ठरले. आज इंडिया टूडे च्या ॲग्रो समीट मध्ये महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्याहस्ते राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुसा येथील ऐ.पी. शिंदे सभागृहात इंडिया टूडे ॲग्रो समीटचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, इंडिया टूडे समूहाच्या प्रकाशन विभागाचे समूह संपादक राज चेंगप्पा, संपादक अंशुमन तिवारी मंचावर उपस्थित होते. यासह महाराष्ट्राचे मंत्री महादेव जानकर, विविध श्रेणीतील पुरस्कार प्राप्त राज्यांचे मंत्री तसेच शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
इंडिया टूडे ने केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्याने केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे राबविण्यात येणा-या ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्राने सर्वाधिक चांगले कार्य केल्याचे निदर्शनात आले. ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्राने मागील तीन वर्षात सरासरी दूध उत्पादनात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. वर्ष 2013-14 मध्ये राज्यात 90.8 लाख मीट्रिक टन दूध उत्पादन व्हायचे तर यात वाढ होऊन वर्ष 2016-17 मध्ये 104 लाख मीट्रिक टन इतके झाले आहे.
महाराष्ट्रात पालघर, पोहरा आणि तथावडे येथे गोकुळ ग्रामांची स्थापना झाली असून इतर गावेही गोकुळ ग्राम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. देशी वंशाच्या पशुंचे संरक्षण आणि संवर्धन तसेच वेटनरी रूग्णाल्यांमध्ये सर्व पायाभूत व आधूनिक सूविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे सर्वेक्षणात आढळले.
नंदुरबारचे सुरेश पाटिल सर्वोत्कृष्ट शेतकरी
नंदुरबार जिल्ह्यातील होळ गावातील सुरेश पाटिल हे देशभरात ‘सर्वोत्कृष्ट शेतकरी’ ठरले असून केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्याहस्ते श्री पाटील यांना सन्मानित करण्यात आले. सुरेश पाटिल यांनी कृषी विज्ञानमध्ये पदवीका घेतली आहे. श्री पाटील यांची 11 एकर शेती आहे. ही दूष्काळप्रवण क्षेतात मोडते. त्यांच्या गांवापासून 6 कीलोमीटर अंतरावर तापी नदी आहे. या नदीचे पाणी शेतीला मिळावे यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला. बँकेतून कर्ज काढण्याचाही प्रयत्न केला काही कारणास्तव हे कर्ज मिळू शकले नाही. मात्र, जिद्द न सोडता त्यांनी पत्नी व आईचे दागिणे गहाण ठेवून कर्ज मिळविले. नदीतून पाईपलाईनव्दारे लिफ्ट सिंचनकरून पाणी शेताला पूरविले. आज ते सर्वच हंगामातील पीक घेतात. श्री पाटील यांचा यशस्वी प्रयोग पाहुन गावातील इतर शेतक-यांनीही लीफ्ट सिंचनाचा उपयोग करून शेती करू लागले. त्यांच्या या नावीन्यपूर्ण यशस्वी प्रयोगासाठी त्यांना आज सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरिवण्यात आले.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...