मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यास प्रारंभ
राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी
ब्लूमबर्ग सहकार्य वाढविणार

मुंबई, दि. 14: राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समुहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. न्यूयॉर्क येथे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची ब्लूमबर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी यासंदर्भातमहत्त्वपूर्ण चर्चा झाली.
मुख्‍यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाचे कॅनडाच्या दौऱ्यावरुन आज अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आगमनझाले. भारताचे न्यूयॉर्कमधील कॉन्सुल जनरल संदीप चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री न्यूयॉर्ककडे रवाना झाले. राज्यातील रस्ते सुरक्षिततेबाबतच्या उपक्रमांना ब्लूमबर्गचे मोठे पाठबळ लाभले आहे. त्याबाबत या समुहाशी फेब्रुवारी 2015 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार झालेल्या उपाययोजनांमुळे रस्ते अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याबरोबरच अशा घटनांमधील जीवितहानी देखील कमी करण्यात यश आले आहे.
महाराष्ट्रासोबतच्या सहकार्याची व्याप्ती वाढवितानाच राज्याच्या फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसोबत संयुक्तरित्या काम करण्याचा मनोदय श्री. ब्लुमबर्ग यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.
देशाच्या विकासयात्रेचा महाराष्ट्र अग्रदूत
महाराष्ट्राने देशातील अग्रेसरत्व पुन्हा सिद्ध केले असून देशाच्या विकासयात्रेचा अग्रदूत म्हणून महाराष्ट्र सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विविध क्षेत्रातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामुळे मुंबई आपली ओळख कायम राखून अत्यंत गतीने परिवर्तन अनुभवत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज न्यूयॉर्क येथे काढले.
न्यूयॉर्कमधील भारतीय कॉन्सुलेट जनरल आणि महाराष्ट्र मित्र मंडळातर्फे मुंबई मीट्स मॅनहटनया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांशीमराठीत दिलखुलास संवाद साधला.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांचीमोठीउपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महानगरात 250 किलोमीटर लांबीचे महाकाय मेट्रो जाळे, मुंबई-ट्रान्सहार्बर लिंक, जलवाहतूक, सागरी किनारा द्रुतगती मार्ग, उपनगरी उन्नत रेल्वेमार्गांची उभारणी आदींमुळे नवी दळणवळण क्रांती होणार आहे. तसेच प्रगत देशांप्रमाणे सिंगल टिकिटिंगच्या माध्यमातून या साऱ्या परिवहन यंत्रणांमध्ये समन्वय साधला जाणार आहे.
शाश्वत कृषी विकासासाठी जलसंधारणाचे महत्त्व विशद करताना श्री. फडणवीस म्हणाले,महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे.त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याने 11 हजारांहून अधिक गावे जलयुक्त आणि टँकरमुक्त झाली आहेत. यासोबतच प्रधानमंत्र्यांच्या कुशल नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या जनधन, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना आदी योजनांमुळे देशात एक मूलभूत परिवर्तन होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती