मुद्रा बँक योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवावा
मुद्रा समन्वय समितीचे बँकांना निर्देश
          अमरावती, दि. 9 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील तसेच छोट्या व्यावसायिकांना विनातारण कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मुद्रा बँक योजना अंमलात आणली. तिचा लाभ अधिकाधिक नागरिकांना होण्यासाठी बँकांनी उद्दिष्ट निश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीने आज दिले.
          समितीची बैठक नियोजन भवनात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. राज्यस्तरीय समितीचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, निवेदिता दिघडे, जिल्हा समितीचे सदस्य सोपान गुडधे, अग्रणी बँकेचे जितेंद्रकुमार झा, सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, लेखाधिकारी वर्षा पुसदकर, यांच्यासह विविध बँकेचे शाखा प्रबंधक तसेच प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी श्री. बांगर म्हणाले की, जिल्ह्यात छोटा व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचून कर्ज वितरणाला गती द्यावी. संवेदनशीलता व सकारात्मकतेने ही प्रक्रिया राबवावी. नागरिकांना माहिती मिळण्यासाठी बँकांनी नियमित मेळाव्याचे आयोजन करावे. जिल्ह्यात गतवर्षी 241 कोटी रुपयांचे वाटप झाले. त्यात शिशू वर्गाचा वाटा अधिक आहे, याचा परफॉर्मन्स वाढवावा. काही बँकांच्या कर्ज वाटपाचे प्रमाण 1 कोटीहून कमी आहे, ते तत्काळ वाढवावे. 
           श्री. सूर्यवंशी म्हणाले की, मुद्रा बँक योजना सर्वांगीण विकास प्रक्रियेला गती देणारी आहे. जिल्ह्यातील बँकांचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकांचेही वाटपाचे प्रमाण समाधानकारक नाही. लाभार्थ्यांची खाती अनुत्पादक कर्जयादीत जातात असा चुकीचा समज आहे. प्रत्यक्षात या कर्जांची हमी केंद्र शासनाने घेतली आहे. योजनेत अधिकाधिक लोकांना समाविष्ट करुन घेण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांची गरज ओळखून तत्काळ कर्ज वितरण केले पाहिजे. योजनेचे उद्दिष्ट ठरवून तत्काळ अधिकाधिक अर्ज मागवून गरजूंना कर्ज उपलब्ध करुन द्यावे व कार्यवाहीचा अहवाल समितीला सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले.
          श्री. पातुरकर म्हणाले की, गरजूंना बँकेत माहिती तसेच अर्ज उपलब्ध करुन दिला जात नसल्याच्या तक्रारी होतात हे अत्यंत गंभीर आहे. गरजूंच्या मागणीकडे बँकांनी संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे.  त्यांना अर्ज उपलब्ध करुन देणे, कागदपत्रे जमा करुन घेणे, त्रुटी असल्यास पुर्ण करुन घेणे आदी प्रक्रिया प्रत्येक गरजूबाबत झालीच पाहिजे.
          श्रीमती चौधरी म्हणाल्या की, योजनेची परिणामकारकता वाढविण्यासाठी माहितीचा प्रसार सर्वदूर झाला पाहिजे त्यासाठी यशकथा, फलक, थिएटर जाहिरात, रंगमंच सादरीकरण आदी विविध माध्यमे वापरली पाहिजेत. बँकांनी आपल्या शाखेत व शाखेबाहेर योजनेची माहिती देणारे फलक लावावेत व तालुकास्तरावर मेळावे आयोजित करावेत.
          श्री. झा म्हणाले की, योजनेचा अर्ज ऑनलाईन डाऊनलोड करता येतो, त्यामुळे तो उपलब्ध नाही अशी माहिती देणे गंभीर आहे. सर्व बँकांनी हे अर्ज उपलब्ध ठेवावेत व नागरिकांना सहकार्य करावे.
          लवकरच याबाबत मेळावे आयोजित करण्याचे निर्देशही समितीने दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती