खरीप कर्ज वाटपाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
संपर्क अधिकाऱ्यांना समन्वयाचे आदेश
  अमरावती,दि.9: :  खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टानुसार आतापर्यंतचे वाटप समाधानकारक नाही.  1 हजार 630 कोटी रुपयांचे उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करण्यासाठी बँकांनी वाटपाला गती द्यावी तसेच जिल्हा प्रशासनाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी बँकांचा परफॉर्मन्स वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी बैठक नियोजनभवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. अग्रणी बँकेचे जितेंद्रकुमार झा, उपनिबंधक कार्यालयाचे श्री. पतंगे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, संपर्क अधिकारी व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
श्री. बांगर म्हणाले की, उद्दिष्टाच्या तुलनेत वाटपाचे सध्याचे प्रमाण कमी आहे. पावसाला सुरुवात झाली असुन लवकर पेरण्या होणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आदी विविध गरजांसाठी वेळेत कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. नागरिकांची अडचण संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांना कर्ज मिळण्यासाठी पुरेपूर मदत केली पाहिजे. बँकांशी संपर्क व समन्वयाची जबाबदारी स्वतंत्रपणे संपर्क अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या संपर्क अधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करावा व सुलभ पीक कर्ज अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे.
ते पुढे म्हणाले की, संपर्क अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शाखानिहाय कर्ज वितरणाची माहिती घ्यावी. बँकांनी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी कर्जाबाबतच्या सर्व बाबींची माहिती ठळक फलकावर लावली पाहिजे. कर्ज मेळाव्यांचे आयोजन करावे. संपर्क अधिकाऱ्यांनी शाखांनी फलक लावले किंवा कसे हेही तपासावे.   
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकनिहाय कर्ज वितरणाचा आढावा घेतला. अलाहाबाद बँक, सिंडीकेट बँक, पंजाब नॅशनल बँक, आंध्रा बँक, यांनी कर्ज वितरणाचा परफॉर्मन्स वाढवावा. कमर्शीयल बँकांनीही उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत. बँक ऑफ बडोदा कडून 1 कोटी वितरण झाले असले तरी उद्दिष्ट 9 कोटीचे आहे. मेळघाटात शाखा असणाऱ्या बँकांनी विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सहकार्य करावे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही मोठे मनुष्यबळ असलेली यंत्रणा असूनही कर्ज वाटपाची गती समाधानकारक नाही, ती वाढवली पाहिजे,आदी निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती