खरीप पीक कर्ज वाटपाचा पालकमंत्र्यांकडून आढावा
मुदतीत कर्ज वितरण करावे
                                 


   - पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
            अमरावती, दि.2:  खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे 1 हजार 630 कोटी रुपयांचे उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करण्यासाठी बँकांनी परफॉर्मन्स वाढवावा. एकही पात्र व्यक्ती कर्ज मिळण्यापासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे दिले.
खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी बैठक नियोजनभवनात आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा उपनिबंधक कल्पना धोपे, अग्रणी बँकेचे झा आदी उपस्थित होते. श्री. पोटे-पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून विकासप्रक्रियेला गती दिली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचा कर्ज वाटप प्रक्रियेत समावेश होण्यासाठी प्रयत्न करावेत. पीक कर्ज वाटप बैठक
 आतापर्यंत 118 कोटी 16 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे वितरणाची गती वाढवावी. बँकांनी संपर्क व समन्वयाची जबाबदारी स्वतंत्रपणे एका अधिकाऱ्यावर सोपवावी. अर्ज घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधावा. त्यांना परिपूर्ण माहिती द्यावी व कर्ज मिळण्यासाठी मदत करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
प्रशासनाकडून संपर्क अधिकारी नियुक्त : जिल्हाधिकारी श्री. बांगर
सर्व बँकांसाठी खरीप पीक कर्जाबाबत कार्यवाहीसाठी शाखानिहाय संपर्क अधिकारी प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी
 श्री. बांगर यांनी यावेळी दिली. या संपर्क अधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करावा व सुलभ पीक कर्ज अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी बँकनिहाय कर्ज वितरणाचा आढावा घेण्यात आला. अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, बँक ऑफ बडोदा, युको बँक, युनियन बँक यांचा  कर्ज वितरणाचा परफॉर्मन्स वाढवावा. कमर्शीयल बँकांनीही उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत. बँकांनी सादरीकरण करतांना परिपूर्ण माहिती दिली पाहिजे. बँकांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी बैठकीला प्रतिनिधींना न पाठवता स्वत: उपस्थित राहावे, आदी निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात  एकूण 4 लाख 15 हजार 858 शेतकरी खातेदार असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत 1 लाख 97 हजार 793 अर्ज दाखल झाले. 1 लाख 17 हजार शेतकऱ्यांना एकूण 737 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला, अशी माहिती उपनिबंधक काया्रलयातर्फे देण्यात आली.        
या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती