शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्रवेशाला आजपासून सुरुवात

 

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्रवेशाला आजपासून सुरुवात

अमरावती, दि. 1 : शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये नाविण्यपूर्ण व विद्यार्थ्यांना रोजगार आणि  स्वयंरोजगार मिळवून देणाऱ्या नविन अभ्यासक्रमांना सत्र 2023-24 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेला उद्या गुरुवार दि. 2 जूनपासून प्रारंभ होणार आहे. प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्ता व शासकीय नियमानुसार देण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेसाठी संस्थेच्या www.gvishamt.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या संचालक डॉ. अंजली देशमुख यांनी केले आहे.

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला ‘नॅक मुल्यांकनामध्ये ‘अ श्रेणी प्राप्त आहे. सन 2021-22 पासून विद्यापीठ अनुदान आयोग व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने संस्थेला स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. स्वायत्तता प्राप्त झाल्यामुळे संस्थेने सर्व अभ्यासक्रमांमध्ये बदल करुन राष्ट्रीय पातळीवर इतर प्रगत शैक्षणिक संस्थांच्या बरोबरीने आधुनिक शिक्षण पध्दती अवलंबिली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पध्दती येथे सुरु करण्यात आलेली आहे. सीबीएससी प्रणाली लागू करणारी या विभागातील ही पहिली संस्था आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नवीन आराखड्यानुसार पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 22 विविध विषयांचे नाविण्यपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मेजर म्हणजेच ज्या विषयामध्ये तुम्हाला प्राविण्य मिळवायचे आहे असा विषय तसेच मायनर म्हणजे ज्या विषयामध्ये तुम्हाला आवड आहे आणि जो विषय तुम्हाला पूरक म्हणून घ्यावासा वाटतो असा विषय, जेनेरिक इलेक्टिव्ह म्हणजेच माहितीवर आधारित विषय असून आपली विद्या शाखा सोडून इतर विद्या शाखेमधील विषय, स्कील इन्हान्समेंट कोर्स म्हणजेच तुम्हाला जे कौशल्य आत्मसात करायचे असेल अशा विविध विषयांचा अंर्तभाव आहे.

या सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास एकाच संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना विविध विषय शिकण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. संस्थेमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा, सभागृह, वर्गखोल्या, वाचनालय, भव्य क्रिडांगणे, वसतिगृहे, योगा केंद्र, एनसीसी, एनएसएस तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती