महसूल कर्मचाऱ्यांना क्षमतावृद्धीचे धडे

 



महसूल कर्मचाऱ्यांना क्षमतावृद्धीचे धडे

अमरावती, दि. १३ :  ताणतणावांचे निरसन करत कौशल्य विकसन व क्षमता बांधणीद्वारे कामकाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्राचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या उपस्थितीत आज महसूलभवनात या उपक्रमाची सुरुवात झाली. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी व या उपक्रमाचे नोडल अधिकारी राम लंके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपलब्ध संसाधनांचा वापर करून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी क्षमता बांधणी अत्यावश्यक  आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. हसत खेळत अनौपचारिक पद्धतीने कामकाजाची गुणवत्ता वाढविणे हा उद्देश आहे. छोटी छोटी कौशल्ये आत्मसात केली व नियम समजावून घेतले तर कामकाजातील चुका टाळता येतात. त्यामुळे इतर कार्यालयांनीही आपल्या स्तरावर असे प्रशिक्षण आयोजित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. भाकरे यांनी दिले.

अगदी सहजतेने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामकाजात होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात, याची माहिती प्रशिक्षणातून देण्यात येत आहे. टपाल निपटारा, टिपणी लेखन, पत्र लेखन, अभिलेख जतन , निवृत्ती वेतन, बीडीएस प्रणालीचे तपशीलवार ज्ञान , कायदेशीर तरतुदीनुसार कामकाज आदी बाबी याद्वारे साध्य करावयाच्या आहेत. सर्व कर्मचारी कामकाजात पारंगत कसे होतील, याचा प्रयत्न या प्रशिक्षणातून होणार आहे, असे नोडल अधिकारी श्री. लंके सांगितले.

प्रोत्साहनपर उपक्रम

कामकाजात गुणवत्ता वाढीसाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत कर्मचाऱ्यांच्या सत्काराचाही उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्यात ई-ऑफिसचा सर्वाधिक वापर करणाऱ्या कर्मचाऱ्याला गौरविण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. घोडके यांनी दिली. या महिन्यात ई- ऑफिसचा सर्वाधिक वापर करणाऱ्या महसूल सहायक हरीश खरबडकर यांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती