मेळघाट टँकरमुक्त करण्यासाठी जलसंधारणाच्या योजना भरीवपणे राबवा - प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 



मेळघाट टँकरमुक्त करण्यासाठी जलसंधारणाच्या योजना भरीवपणे राबवा

-      प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे 


            अमरावती दि. 16 : मेळघाट टँकरमुक्त करण्यासाठी भूजलपातळी सुधारणा उपाययोजना व जलस्त्रोतांचे बळकटीकरण आवश्यक आहे. त्यामुळे वनक्षेत्रानजिकच्या टँकरग्रस्त गावांच्या परिसरात जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिले आहेत.   


तसे पत्रही जिल्हाधिका-यांनी सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंक्षक दिव्याभारती एम. यांना दिले आहे. मेळघाटात नवसंजीवनी,  गाभा समितीची सभा व विविध गावांना अधिका-यांची भेट असा कार्यक्रम नुकताच झाला. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात आकी, मोथा, खोगडा, रायपुर, सोमवारखेडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझीरा या गावांमध्ये एकूण 12 टँकरद्वारे सद्य:स्थितीत पाणीपुरवठा सुरु आहे. पाणी टंचाई आराखड्यानुसार एकूण 19 गावे टॅंकरग्रस्त असून, या गावांसाठी जिल्हापरिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे.


                    ही सर्व गावे आदिवासीबहुल क्षेत्रातील आहेत. स्थानिक आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी पेयजलाबरोबरच शेतीलाही पाणी उपलब्ध होण्यासाठी जलस्त्रोतांचे बळकटीकरण व जलसंधारणाच्या ठिकठिकाणी छोट्याछोट्या उपाययोजना राबवून भूजलपातळी वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक आहेत.


जलयुक्त शिवार योजनेत सन 2023-24 च्या आराखड्यात या गावांचा समावेश आहे. मात्र, गावांनजिक  मोठ्या प्रमाणात वन क्षेत्र समाविष्ट असल्यामुळे प्रस्तावित विकासात्मक कामे करण्यात अडचणी निर्माण होतात. या परिसरातील जलसंधारणाची कामे वनविभागामार्फत कार्यान्वित होत असल्यामुळे सर्व योजनांची  सांगड घालून ती ठिकठिकाणी राबवावीत. त्यामुळे आदिवासीबहूल भागात रोजगार उपलब्धतेसह या क्षेत्रात जलसंचय होऊन भूजलपातळी वाढेल व पाणीटंचाईवर मात करता येईल. जलसाठ्यांचा वन्य प्राण्यांनाही फायदा होईल, असे पत्र जिल्हाधिका-यांनी उपवनसंरक्षकांना पाठविले आहे.  


000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती