मेळघाटचे प्रश्न सोडविण्यासाठी समग्र विकास आराखडा साकारणार - प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 


अधिका-यांचा गुरूवारी मेळघाटात मुक्काम; उपाययोजनांसाठी शुक्रवारी चिखलद-यात बैठक

मेळघाटचे प्रश्न  सोडविण्यासाठी समग्र विकास आराखडा साकारणार

-  प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 

अमरावती, दि. 6 : मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी जाणून त्यावर ठोस उपाययोजना व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने समग्र विकास आराखडा साकारण्यासाठी विविध अधिकारी गुरूवारी (दि. 8 जून) रोजी चिखलदरा व धारणी तालुक्यांतील गावांमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यानंतर या सर्व अधिका-यांची महत्वपूर्ण बैठक दि. 9 जूनला चिखलदरा येथे होणार असून, त्यात नागरिकांच्या निवेदनावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिली.     

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, एकात्मिक बालविकास सेवा योजनेसह जिल्हास्तरावरील 27 यंत्रणांचे अधिकारी मेळघाटातील नागरिकांमध्ये स्वत: मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. दोन्ही तालुक्यांतील सर्व विभागांचे अधिकारी त्यात सहभागी असतील. मेळघाटातील कुपोषणाची समस्या, आरोग्याचे प्रश्न याबरोबरच तेथील शेती, पेयजल, रस्ते आदी गावपातळीवरील सुविधा, अडचणी, आवश्यक सुधारणा यांची माहिती यात घेतली जाणार आहे.

चिखलद-यात शुक्रवारी बैठक

अधिका-यांच्या गावभेटीत प्राप्त सूचना, मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व विभागांच्या अधिका-यांची बैठक चिखलदरा येथे शुक्रवारी होईल.  प्राप्त माहितीनुसार स्थानिकांच्या समस्यांवर उपाययोजना करतानाच दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने समग्र विकास आराखडा साकारण्यात येणार आहे, असे श्री. भाकरे यांनी सांगितले.

धारणी येथील प्रकल्प अधिका-यांकडे नियमित समन्वयाची जबाबदारी

शासकीय योजना, सुविधा व सेवांच्या अधिक परिणामकारकतेसाठी विविध विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मेळघाटातील सर्व यंत्रणांसाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिका-यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम करावे व मेळघाटातील विविध विभागांच्या कामांचा आढावा नियमितपणे घ्यावा, असे पत्र जिल्हाधिका-यांनी प्रकल्प अधिका-यांना दिले आहे.

 

 

प्रकल्प अधिका-यांनी दर पंधरवड्याला बैठक घेऊन मेळघाटातील सर्व यंत्रणांच्या कामांचा आढावा घ्यावा. जिल्हास्तरावरून कार्यवाही अपेक्षित असल्यास वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला अवगत करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोग्य साधनसामग्रीबाबत सात दिवसांत अहवाल द्यावा

पावसाळा लक्षात घेता आरोग्य तपासणी व उपचारासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना व आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध साधनसामग्री तपासून ती सुस्थितीत असल्याची खातरजमा करून घ्यावी व तसा अहवाल 7 दिवसांत द्यावा. आवश्यक साधने वेळीच उपलब्ध करून घ्यावी.  बालविकास योजना व आरोग्य यंत्रणेच्या सर्व केंद्रांवर आवश्यक सामग्री, पुरेसा औषधसाठा असणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

 

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती