Wednesday, June 14, 2023

किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबिरांना सुरूवात

 




शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.  माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात अनेकविध सोयी-सुविधा निर्माण झाल्या; पण सर्च इंजिनवर अन्नधान्य  डाऊनलोड होत नसते. शेतकरी बांधव भूमीत रक्तघाम गाळून अन्नधान्याचे उत्पादन करतो. त्यामुळे त्यांच्याप्रती संवेदनशीलता बाळगून योजनांची अंमलबजावणी व्हावी. त्यांची अडवणूक होता कामा नये. तांत्रिक त्रुटी असल्यास तिची पूर्तता करून घेऊन त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी यावेळी दिले.

किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबिरांना सुरूवात

अमरावती, दि. 14 : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाकडून विविध योजनांच्या  अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी शिबिरे, मेळावे घेण्यात येत आहेत. याच उपक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या शिबिरांनाही आजपासून सुरूवात झाली.

पात्र असूनही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या व्यक्तींना तो मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी शिबिरे घ्यावीत, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिले होते. त्यानुसार योजनेत प्रलंबित अर्जांची संख्या जास्त असलेल्या गावांमध्ये शिबिरांना सुरूवात झाली. मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई व सारवाडी, तसेच दर्यापूर तालुक्यात पिंपळोद, थिलोरी, लोतवाडा, सांगळूद येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. 

जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी नेरपिंगळाई, सारवाडी येथील शिबिरांना भेट देऊन कामाचा आढावा घेतला. योजनेत जून 2022 नंतर प्रलंबित अर्जांचा निपटारा या शिबिरांच्या माध्यमातून होत आहे. योजनेच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांना सुस्पष्ट माहिती मिळावी यासाठी मोठ्या आकारातील फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. खरीप हंगाम लक्षात घेता या योजनेतील अनुदान तत्काळ मिळाल्यास त्याचा शेतकरी बांधवांना लाभ होईल. त्यासाठी शिबिरे घेण्यात येत आहेत, असे श्री. भाकरे यांनी सांगितले.

प्रशासनातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका स्तरावरील अधिकारी- कर्मचा-यांकडून तत्पर कार्यवाही होत असल्याबद्दल जिल्हाधिका-यांनी अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले. अर्ज भरणे, केवायसी आदी तांत्रिक पूर्ततेसाठी प्रशासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनीही शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यासंबंधी निराकरणाचे निर्देश यंत्रणेला दिले.

 

०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...