योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागांचा समन्वय आवश्यक - जिल्हाधिकारी विजय भाकरे

 


योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागांचा समन्वय आवश्यक

- जिल्हाधिकारी विजय भाकरे

 

अमरावती, दि. 5 : विविध शासकीय विभागांमधील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी विविध विभागांत परस्पर समन्वय आवश्यक आहे. अनेकदा इतर विभागाची नाहरकत प्रमाणपत्रे किंवा कार्यवाही झालेली नसल्याने अनेक कामे प्रलंबित राहतात. हे टाळण्यासाठी इतर विभागांशी संबंधित प्रलंबित कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असून, त्यासाठी विशेष कार्यपद्धती जिल्हास्तरावर राबवली जाईल, असे जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्र. निवासी उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. भाकरे म्हणाले की, शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एकाचवेळी अनेक विभाग संबंधित असतात. त्यामुळे योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी परस्पर संवाद व समन्वय आवश्यक असतो, जेणेकरून 'कम्युनिकेशन गॅप' निर्माण होणार नाही. अनेकदा दोन किंवा त्याहून अधिक योजनांची सांगड घातल्यास योजनेची परिणामकारकता वाढते व गरजूंना त्याचा चांगला लाभ मिळतो. त्यादृष्टीने सर्व अधिका-यांनी इतर विभागांशी समन्वय ठेवून विकास प्रक्रिया अधिक गतिमान होईल, या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

इतर विभागाशी प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा

नैसर्गिक आपत्ती, विविध ठिकाणांहून येणा-या मागण्या, आंदोलने, तक्रारी, निवेदने आदींबाबत करावयाच्या कार्यवाहीत स्पष्टता, नेमकेपण असणे आवश्यक असते. दोन विभागांत संवाद नसल्यास कामे प्रलंबित राहतात. हे टाळण्यासाठी जिल्हा स्तरावर एखाद्या विभागाच्या इतर कार्यालयांकडे प्रलंबित प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. त्यादृष्टीने पुढील बैठकीत सर्व विभागप्रमुखांनी इतर विभागांशी संबंधित प्रलंबित कामांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. भाकरे यांनी दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती