‘मिशन मेळघाट’अंतर्गत दीर्घकालीन विकास आराखडा - प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे




‘मिशन मेळघाटअंतर्गत दीर्घकालीन विकास आराखडा

-  प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 अमरावती, दि. 16 : ‘मिशन मेळघाटमध्ये चिखलदरा व धारणी  या दोन तालुक्यांसाठी गाव व पाडे हे एकक मानून समग्र विकास आराखडा आकारास येत असून, दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत, असे प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सांगितले.

मिशन मेळघाट, गाभा समितीची बैठक व गावोगाव विविध अधिका-यांच्या भेटी असा कार्यक्रम नुकताच झाला. त्यातील निर्णयानुसार मेळघाटाची विशिष्ट भौगोलिक संरचना लक्षात घेऊन सामाजिक, आर्थिक बाबींच्या अनुषंगाने आताच्या व भविष्यातील आवश्यक सुविधांसाठी 2047 पर्यंतचे नियोजन करण्यात येत आहे.

मेळघाटातील कुपोषण, आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणीपूरवठा, वनहक्क कायदा व पेसा कायदा यानुसार हा आराखडा तयार होणार असून, जिल्हा नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिका-यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुकास्तरीय नोडल अधिकारी  दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार व गटविकास अधिकारी असतील, अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. 

   ते म्हणाले की, याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मेळघाटात उपलब्ध सुविधांची माहिती संकलित करणे, अल्पकालीन उपाययोजनांत सन 2027 व 2037 पर्यंतचे व दीर्घकालीन उपाययोजनेत सन 2047 पर्यंतचे नियोजन करण्यात येईल. नोडल अधिका-यांवर सर्व यंत्रणांचा समन्वय व साप्ताहिक आढाव्याची जबाबदारी असेल. आराखडयास गावस्तरावर प्रसिध्दी देऊन स्थानिकांचे अभिप्राय व सूचना घेण्यात येतील व त्यानंतर विकास आराखडा अंतिम होईल. क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था, व्यक्तींचेही सहकार्य घेतले जाईल.

धारणी व चिखलदरा येथे जिल्हा प्रशासनाकडून दर 15 दिवसांनी सर्व यंत्रणांची आढावा सभा घेण्यात येईल. नोडल अधिका-यांनी धारणी येथील प्रकल्प अधिका-यांमार्फत आवश्यक संसाधनांची उपलब्धता करून घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिका-यांनी  दिले.

00000

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती