Monday, June 12, 2023

कालबद्ध पद्धतीने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा - प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 

किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता गावोगाव शिबिरे

कालबद्ध पद्धतीने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा

 

-  प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 

अमरावती, दि. 12 : पात्र असूनही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या व्यक्तींना तो मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी शिबिरे घ्यावीत व तिथेच तांत्रिक त्रुटींची पूर्तता करून घेऊन संबंधितांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज दिले.

 

योजनेचा लाभ पात्र व्यक्तींना मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिका-यांनी उपविभागीय अधिका-यांची ऑनलाईन बैठक घेऊन निर्देश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. 

 

जिल्हाधिकारी श्री. भाकरे म्हणाले की, योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतक-यांना त्रुटीच्या पूर्ततेबद्दल परिपूर्ण माहिती द्यावी.  अर्जाच्या कार्यपद्धतीबद्दल ठिकठिकाणी मोठ्या आकारात मार्गदर्शक फलक लावावेत. प्रलंबित अर्जांची संख्या ज्या गावांमध्ये जास्त आहे, तिथे शिबिरे घेऊन जागेवरच निपटारा करावा. सीएससी केंद्रे, ग्रामसेवक, कृषी सहायक यांचे सहकार्य घ्यावे.

 

केवायसी पूर्तता करा

 

अनेक प्रकरणी बँक केवायसी पूर्ण नसणे आदी त्रुटी आढळतात. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून  ‘झिरो बॅलन्स’वर खाते उघडण्याची सोय आहे. त्यांच्या प्रतिनिधींकडून संबंधितांची खाती उघडण्यास सहकार्य करावे जेणेकरून केवायसीची पूर्तता होईल व संबंधितांना योजनेचा लाभ मिळू शकेल. प्रत्येक पात्र व्यक्तीला पूर्ण लाभ मिळेपर्यंत याप्रकरणी पाठपुरावा करावा व कार्यवाहीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला द्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

अशी आहे कार्यपद्धती

 

केंद्र शासनाने पीएम किसानबाबत कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यात ई-केवायसी करण्यासाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधून बायोमेट्रिक व मोबाईलवर प्राप्त होणा-या ओटीपीद्वारे किंवा लाभार्थी स्वत: pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर कॉर्नरमध्ये ई-केवायसी हा पर्याय निवडून आधार क्रमांक नमूद करून प्राप्त होणा-या ओटीपीद्वारे, तसेच पीएम किसान ॲपद्वारे फेस ऑथेटिंकेशनद्वारेही करता येते.

 

 योजनेचे हप्ते आधारशी संलग्न व डीबीटी मोड सुरू असलेल्या बँक खात्यात जमा होतात. त्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेशी संपर्क साधून आधारसोबत जोडण्याचे व डीबीटी मोड एनेबल करण्याचे कळवावे किंवा इंडियन पोस्ट पेमेंटस् बँकेच्या माध्यमातून गावपातळीवर या योजनेचे आधार सीडेड बँक खाते उघडता येते. तशी सोय सर्व पोस्ट कार्यालयांत आहे. शेतीची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी आधारकार्ड, सातबारा, आठ अ व मोबाईल क्रमांक तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...