वनहक्क दावे कालमर्यादेत निकाली काढा - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 


विभागीय वनहक्क समिती बैठक सपन्न

वनहक्क दावे कालमर्यादेत निकाली काढा

-         विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 

दाखल 46 पैकी 39 वनहक्क दावे निकाली

 

अमरावती, दि. 15 : अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वनवासी (१३ डिसेंबर २००५ पूर्वी किमान तीन पिढ्यांपासून मुख्यत्वेकरून वनात राहणारा आणि उपजीविकेसाठी वनांवर किंवा वन जमिनीवर अवलंबून असणारे) यांना त्यांच्या पूर्वजांपासून कसत असलेल्या वनातील जमीनीचा वैयक्तिक व सामूहिक वनहक्क अधिकार ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६’नुसार मिळाला आहे. या अनिनियमानुसार स्थापित वनहक्क समितीकडे दाखल झालेले वनहक्क दाव्यांचे अर्ज कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी संबंधित यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय वनहक्क समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय वनहक्क समितीची बैठक श्रीमती पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्र. मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, आदिवासी विकास अपर आयुक्त सुरेश वानखेडे, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, किरण जगताप, सहायक आयुक्त (भुसूधार) श्यामकांत मस्के, वरिष्ठ संशोधन अधिकारी प्रिती तेलखेडे, व्यवस्थापक संजय लगड आदी यावेळी उपस्थित होते.

            डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, वनहक्क दाव्यासाठी दाखल केलेल्या वैयक्तिक व सामुहिक दाव्यांची प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने व वनविभागाने संयुक्तरित्या प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन वर्ष 2005 पूर्वीपासून वन जमीनीवर वहिती तसेच ताबा सिध्द करणारे सबळ पुरावे तपासावे.  ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६’ अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. आदिवासी बांधवांना लवकर लाभ मिळेल, त्यादृष्टीने दाखल केलेल्या अर्जांवर जबाबदारीपूर्वक कार्यवाही व्हावी.

            त्या पुढे म्हणाल्या की, अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यातील वनाधारित ग्रामसभांना अधिनियमातील कलमान्वये सामुहिक दाव्यांबाबतचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. वनाधारित ग्रामसभांनी आपल्या गावाचे नियोजनबध्द सामुहिक आराखडे तयार करुन शासनाला सादर करावे. जेणेकरुन गावाला वनोपज उत्पादनांच्या माध्यमातून रोजगार तसेच उदरनिर्वाहाचे साधन सुध्दा उपलब्ध होईल.

दाखल ४६ पैकी ३९ वनहक्क दावे निकाली

आज सुणावनीसाठी ठेवण्यात आलेल्या वनहक्क दाव्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील 17 व यवतमाळ जिल्ह्याचे 29 असे एकूण 46 दावे होते. त्यात 44 दावे आदिवासींचे तर 2 दावे गैरआदिवासींचे होते. या सर्व वनहक्क दाव्यांवर समितीतील अध्यक्ष व सदस्यांनी चर्चा केली. वनहक्क दावा दाखल करणाऱ्यांचे म्हणने ऐकून घेतले. सुनावणीअंती 39 वनहक्क दावे निकाली काढण्यात आले असून उर्वरित दावे तपासणी करुन पंधरा दिवसांत निकाली काढण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला दिल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती