डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय दिन साजरा

 





डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे

 सामाजिक न्याय दिन साजरा

 

        अमरावती, दि. 26: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून आज साजरा करण्यात आला.

           सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सकाळी समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समता दिंडीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत यांनी समता दिंडीस हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. समता दिंडीमध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे फलक दर्शविणाऱ्या रथाचा समावेश होता. तसेच आज (दि. 26 जून) आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन असल्याने जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद मार्फत व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ सेवन विरोधी जागरुकता निर्माण करण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी नशामुक्तीबाबत जागरुकता निर्माण करणारे फलक दर्शविले. सामाजिक न्याय भवन परिसरात येऊन मुख्य कार्यक्रमात समता दिंडीचा समारोप करण्यात आला.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक  विजय साळवे, प्रमुख व्याख्याते डॉ. मनिष गवई, सहायक संचालक डॉ. दिनेश मेटकर, लेखा, समाज भुषण पुरस्कारार्थी  उत्तमराव भैसणे, राजाभाऊ गडलिंग, सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.

           डॉ.नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. प्रास्ताविकेत माया केदार यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. गवई यांनी राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली. शाहू महाराज यांनी समाजाच्या दुर्बल घटकास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वत: कृतीतून अंमलबजावणी केली. त्याकाळी मुलींच्या शिक्षणावर भर देण्यासाठी वसतिगृहांची निर्मिती केली. मुलांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांना दंड आकारुन शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले.

           सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत 7 लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात जात वैधता प्रमाणपत्र व अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून प्रोत्साहित करण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी टॅक्ट्रर व त्याची उपसाधने या योजनेंतर्गत 9  मिनी टॅक्ट्ररचे वाटप करण्यात आले.

           सामाजिक न्याय भवनातील अधिकारी, कर्मचारी, बाह्यस्त्रोत यंत्रणेतील कर्मचारी, विविध योजनांचे लाभार्थी तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार राजेश गरूड यांनी मानले.

***

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती