संवाद .. कौशल्यातून समृद्धी कार्यशाळा संपन्न




 संवाद .. कौशल्यातून समृद्धी कार्यशाळा संपन्न

अमरावती, दि. 25 (जिमाका) :  महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय ,अमरावती मार्फत ‘संवाद ..कौशल्यातून समृद्धी’ या एकदिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ.जी.आर. शेकापुरे यांचे हस्ते करण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईचे संचालक दिगंबर दळवी यांनी यावेळी संवाद साधला. विद्याभारती महाविद्यालयीन परिसर स्थित अभिप्रेक्षागार सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . प्रशिक्षणाचा एकत्रित दर्जा व प्रशिक्षणार्थीच्या सर्वंकष गुणवत्ता वाढीसाठी अमरावती विभागातील सर्व गटनिदेशक आणि निदेशक यावेळी उपस्थित होते.

          श्री. दळवी यांनी अनुभवाचे दाखले, संदर्भ, उदाहरणे देत यावेळी उपस्थितांना स्पर्धेच्या युगात अध्यापन कार्याबाबत मार्गदर्शन केले.  वेळेचे व्यवस्थापन, क्रमबद्ध नियोजन, दैनंदिनीनुसार वाटचाल करीत असताना एकाग्रता साधित आपल्या निर्धारित लक्ष्य, उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे या संदर्भात यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कौशल्याधिष्टित शिक्षणाच्या काळात समृद्धीसाठी  अंगिभूत ऊर्जा, सकारात्मकता व अभिक्षमता, क्रयशक्ती तसेच इच्छाशक्तीची जोड देणे गरजेचे असल्याचे श्री. दळवी यावेळी म्हणाले. यावेळी ‘संवाद.....कौशल्यातून समृद्धी’ या संकल्पनेचे मार्गदर्शक म्हणून अमरावतीचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक-प्रदीप घुले, विद्याभारती शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. ए. डी. चव्हाण, मुंबईस्थित मुख्य कार्यालयाचे प्रकल्प समन्वयक नरेंद्र येते, सहायक संचालक रवींद्र लोखंडे आदी उपस्थित होते.      

            कार्यशाळेत उपस्थितांच्या  प्रश्नांचे समाधान करण्यात आले. नवीन प्रशिक्षणाला घेऊन नाविन्यपूर्ण संकल्पना आदी बाबींबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून आलेले 500 गटनिदेशक आणि निदेशक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहसंचालक प्रदीप घुले यांनी संपूर्ण राज्यात अमरावती विभाग अव्वल असल्याचे समाधान व्यक्त केले. विभागात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार  सहायक संचालक रवींद्र लोखंडे यांनी मानले.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती