अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून विविधतेतून एकात्मतेचा संदेश - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 


जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा

अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून विविधतेतून एकात्मतेचा संदेश

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 23 (जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमातील देशभक्तीपर भावनेची अनुभूती आपण सर्वजण अनुभवत आहोत. अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून विविधतेतून एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा शंभर वर्षे पूर्ण होतील त्यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये तुमचे योगदान होते, याचा तुम्हाला अभियान राहील. गावा-गावात शूरवीरांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ शीलाफलक स्थापन करण्यात आले आहे. येणाऱ्या पिढीला हे शीलाफलक शौर्य, त्याग, बलिदान यांचे प्रतीक म्हणून देशसेवा करण्यासाठी प्रेरित करीत राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

नगरपालिका प्रशासन विभागामार्फत ‘माझी माती, माझा देश’ (मिट्टी को नमन, विरों को वंदन) याअंतर्गत जिल्हास्तरीय ‘अमृत कलश यात्रे’चे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. अमृत कलश यात्रेनिमित्त जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे अमृत कलश एकत्रित करण्यात आले. यावेळी श्री. कटियार यांनी अमृत कलशांचे पूजन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त सुमेध अलोणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा अभियान राबविण्यात आले आहे. मातृभूमीसाठी झटणारे तसेच आपल्या प्राणांची आहुती देकणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा, यासाठी हे अभियान देशभर राबविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी श्री. कटियार यावेळी म्हणाले.

जिल्हास्तरीय ‘अमृत कलश’ यावेळी बनविण्यात आला. हा कलश घेऊन 25 ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रतिनिधी मुंबई येथे रवाना होणार आहेत. तेथून राज्यभरातील सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी विशेष रेल्वेने दि. 27 ऑक्टोबर रोजी दिल्लीला जाणार आहेत. दिल्ली येथे मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 1 नोव्हेंबर 2023 रोजी विजयपथ येथे पथसंचलनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर देशातील राज्या-राज्यातून दिल्ली येथे आणण्यात आलेल्या अमृत कलशांच्या माध्यमातून ‘एक विशेष कलश’ निर्माण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली. श्री. कटियार यांच्या हस्ते यावेळी वड, पिंपळ, चिंच, बदाम तसेच उंबर या रोपांची लागवड करुन वृक्षारोपण करण्यात आले. अमरावती येथील बीडीएस डान्स ग्रृपच्या माध्यमातून यावेळी देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्याविष्कार सादर करण्यात आला. यावेळी मुंबई येथे कलश घेऊन जाणारे नगर विकास विभागाचे उप मुख्य अधिकारी गौरव इंगोले, गजानन चक्रनारायण, नगर अभियंता यश अग्रवाल यांना जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते गौरवून त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे संचालन नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा समन्वयक प्रवीण येवतीकर यांनी तर आभार मुख्याधिकारी विकास खंडारे यांनी मानले.

*****









Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती