Friday, October 13, 2023

राष्ट्रीय पोषण महा अभियानात अमरावती जिल्हा राज्यात अव्वल





 

राष्ट्रीय पोषण महा अभियानात अमरावती जिल्हा राज्यात अव्वल

 

निरंतर प्रयत्नाव्दारे कुपोषणाला हरविण्याचा निर्धार करा

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

        अमरावती, दि. 12 (जिमाका): राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत अमरावती जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला असून, या अभियानाच्या अंमलबजावणीत अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पोषण आहार महत्त्वपूर्ण असून या पुढेही हा उपक्रम खेडोपाडी, पाड्यां-पाड्यांवर सर्वदूर राबवावा. केवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतेच नव्हे तर वर्षभर जोमाने काम करत कुपोषणाला हरविण्याचा निर्धार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

राष्ट्रीय पोषण महा अभियानाचा समारोपीय कार्यक्रम आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी मदतनीस, सेविका, पर्यावेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, मुख्य वित्त व लेखा अधिकारी चंद्रशेखर खंडारे, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके तसेच अंगणवाडी ताई, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या अभियानाच्या यशस्वितेबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात मोझरी येथील अंगणवाडी सेविका मेघा बनारसे आणि वरुड येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी साधना पांडे यांचा दिल्ली येथे सन्मान करण्यात आला. येत्या काही दिवसातच अमरावती जिल्ह्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचा वितरण कार्यक्रम मुंबई येथे होणार असून अंगणवाडी सेविकांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक व्हावे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी म्हणून जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            राष्ट्राच्या उत्तम उभारणीसाठी बालकांची जडणघडण योग्यरित्या होणे ही काळाची गरज आहे.यंदाच्या राष्ट्रीय पोषण महाची थीम  ‘सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत’ ही होती. या अनुषंगाने जिल्ह्यात सर्व पातळ्यांवर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ही बाब प्रशंसनीय असल्याचे सांगत श्री. कटियार म्हणाले की, बाळ मातेच्या गर्भात असते तेव्हापासून आणि जन्मल्यानंतर त्यांची योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पोषण आहाराबाबत नाविण्यपूर्ण उपक्रम सातत्याने वर्षभर राबविल्या गेले पाहीजे. विशेष करुन मेळघाटात गाव-गाव, पाड्या-पाड्यांवर हे उपक्रम राबावे, असे निर्देश श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

          आरोग्य विभागामार्फत देशभर सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण आहार महिना हा उपक्रम राबविला जातो. या महिन्यात महिला व बाल कल्याण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून प्रत्येक बालक सदृढ व्हावे यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. अमरावती जिल्ह्याने केंद्र शासनाच्या उपक्रमाबरोबरच वृध्दांचे वाढदिवस, कर्तबगार मुलींचा सन्मान, लोकप्रतिनिधींचा सन्मान, पाककृती स्पर्धा यासारखे विविधांगी उपक्रम राबविले. या अनुषंगाने राज्यस्तरीय चर्चासत्र, राष्ट्रीय चर्चासत्र, जिल्हाधिकारी यांची मुलाखत, आयुक्त एकत्मिक बाल विकास सेवा योजना मुंबई यांची मुलाखत, ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडनचे प्रोफेसर जाक यांची तिवसा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना भेटी यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांच्या पुढाकाराने राबविण्यात आले.

            जिल्ह्यात या उपक्रमात आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. गर्भवती महिलांना आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सकस आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध पाककृती स्पर्धांसारख्या उपक्रमांची जोड देण्यात आली.

            यावेळी श्री. कटियार यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांचा गौरव करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास विभाग तसेच आरोग्य विभागाच्या कार्याचे श्री. कटीयार यांनी कौतुक केले.

0000





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...