वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व व्याख्यान समृध्द समाजमन घडविण्यासाठी सातत्यपूर्ण वाचनाची सवय आवश्यक - उपायुक्त संजय पवार

 









वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व व्याख्यान

समृध्द समाजमन घडविण्यासाठी सातत्यपूर्ण

वाचनाची सवय आवश्यक

                                                - उपायुक्त संजय पवार

      

अमरावती, दि. 13 (जिमाका): समृध्द समाजमन असलेला समाज घडविण्यासाठी सातत्यपूर्ण वाचनाची सवय अत्यंत आवश्यक आहे. भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती आहे. म्हणून आजच्या युवकांनी समाजमाध्यमांच्या जगात हरवून न जाता बहुश्रृत व्यक्ती होण्यासाठी वाचनावर भर द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त संजय पवार यांनी आज येथे केले.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालय येथे ‘वाचन प्रेरणा दिवसा’चे आज आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी उपायुक्त श्री. पवार बोलत होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी ग.मा. कुरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी अश्विन मानकर, ग्रंथालय अधीक्षक दीपक गेडाम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व विषद करताना श्री. पवार म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी युवकांमध्ये वाचन संस्कृती विकसित होणे गरजेचे आहे. केवळ अभ्यासक्रमापुरतेच वाचन न करता अवांतर वाचनावर भर द्यावा. अवांतर वाचनामुळे व्यक्तीमध्ये बहुश्रृतता येऊन सर्वांगिण विचार करण्याची सवय लागते. विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच आपल्या आवडीच्या पुस्तकांची यादी बनवावी. मित्र-मैत्रिणींशी चर्चा करताना प्रत्येकाने आपापल्या आवडत्या पुस्तकांविषयी चर्चा करावी. जेणेकरुन कमी वेळात बऱ्याच पुस्तकांबद्दल माहिती मिळू शकेल. प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार वेगवेगळ्या विषयावर वाचायला आवडते. अशा चर्चेतून आपला कल नेमका कोणत्या विषयात आहे, याबद्दल आपल्याला जाणीव होते. वाचनासाठी चांगली पुस्तके निवडा. चांगले मित्र आणि चांगली पुस्तके सोबत असल्यास आयुष्यात सकारात्मक्ता येते. आयुष्यातील अडचणींच्या प्रसंगी चांगली पुस्तके मार्गदर्शकाचे काम करतात, असेही ते यावेळी म्हणाले.

            वाचता अनेकांना येते परंतु नेमके काय वाचावे, हे फार थोड्यांना कळते. यामुळे वाचन करताना चोखंदळपणा कायम ठेवावा. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अवांतर वाचनाचा खूप फायदा होतो. वाचनामुळे इतिहास तर कळतोच शिवाय त्या समांतर काळात घडलेल्या विविध घटनांची पार्श्वभूमीही कळते. चांगली पुस्तके ही आयुष्यभर दीपस्तंभाचे काम करीत असतात. यासाठी वाचन प्रेरणा दिवसानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याने व्यक्तिमत्त्व विकासासाठी अवांतर वाचनावर भर द्यावा, असे श्रीमती अपर्णा यावलकर यावेळी म्हणाल्या.

माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी विविध प्रकारचे संदेश, व्याख्याने, चर्चासत्रे, अभिवाचन, सामुहिक वाचन, ग्रंथ प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. या अनुषंगाने शासकीय विभागीय ग्रंथालय येथे आजपासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून 18 ऑक्टोबरपर्यंत ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ जास्तीत-जास्त विद्यार्थी तसेच नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरज मडावी यांनी केले. सुत्रसंचालन ग.मा. कुरवाडे यांनी तर आभार अश्विन मानकर यांनी मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती