वनविभाग व संत गाडगेबाबा संस्थेचा स्तुत्य उपक्रम निसर्गाच्या माहितीवर आधारित परीक्षेत 200 विद्यार्थ्यांचा सहभाग

 




वनविभाग व संत गाडगेबाबा संस्थेचा स्तुत्य उपक्रम

निसर्गाच्या माहितीवर आधारित परीक्षेत 200 विद्यार्थ्यांचा सहभाग

 

अमरावती, दि. 31(जिमाका): अमरावती येथील ऑक्सीजन पार्कमध्ये संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यप्राणी, पक्षी व जंगलाचे ज्ञान होण्याच्या दृष्टीने नुकतीच स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी ऑक्सीजन पार्कमध्ये लावलेल्या वन्यप्राणी पक्षांच्या माहितीच्या फलकाचा अभ्यास केला. या स्पर्धा परीक्षेत जवळपास 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल जाहीर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर ठाकरे व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.

मनपा आयुक्त देविदास पवार यांनी या उपक्रमासाठी संस्थेला जी मदत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच हा नाविण्यपूर्ण उपक्रम संत गाडगेबाबा संस्था व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यासाठी मान्यता दिली.

उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच पर्यावरणाबाबत मार्गदर्शन केले. श्री. मिश्रा यांनी ऑक्सीजन पार्क मधील स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाला वनविभागामार्फत सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. किरण पातूरकर, प्राचार्य शीतल मेटकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

स्पर्धा परीक्षेत रामकृष्ण विद्यालयाचा विद्यार्थी संविधान अनिल मडामे हा सर्वात जास्त गुण घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तसेच रामकृष्ण विद्यालयाचा संयुक्त बाळापुरे, प्रज्योत उंबरकर, देवश्री अजमिरे असे एकूण पाच विद्यार्थ्यांनी प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षीस पटकाविले. श्रीराम विद्यालय वडाळीची मानसी इंगळे हिने सर्वच विद्यार्थ्यांमधून दुसरा क्रमांक पटकाविला तर संस्कार किरण पाटील याने व्दितीय क्रमांक पटकाविला.

इयत्ता 8 वी ते 10 वी गटाचे संपूर्ण बक्षिस स्व. आशाबाई खुशालराव पांडव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीपक पांडव, रा. डोंगरयावली, इयत्ता 5 ते 7 गटाचे संपूर्ण बक्षिस स्व. वेणुबाई गणेशराव बोंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राजेंद्र बोंडे, रा. हिवरखेड तर इयत्ता 3 ते 4 गटाचे संपूर्ण बक्षिस स्व. देवीदासपंत रामभाऊजी ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिलींद ढोले रा. मोर्शी यांनी पटकाविले.

अमरावती वनविभाग व संत गाडगेबाबा संस्थानाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीव्दारे निवृत्त वनअधिकारी अशोक कविटकर यांच्याशी संपर्क साधून स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाचे कौतुक करुन अमरावती वनविभाग तसेच संत गाडगेबाबा संस्था यांचे अभिनंदन केले.

संचलन गोवर्धन म्हाला यांनी तर आभार शांताराम उमाळे यांनी मानले. स्पर्धा परीक्षेची ऑक्सीजन पार्कमधील व्यवस्था वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती वर्षा हरणे व त्यांच्या चमूने सांभाळली.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती