नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीपणे राबवा - मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा


 

नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीपणे राबवा

- मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा

अमरावती, दि. 31 (जिमाका) : नव भारत साक्षरता कार्यक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज केले. नव भारत साक्षरता कार्यक्रम 2022-2027 अंतर्गत गठित नियामक परिषद समिती व कार्यकारी समितीची दुसरी बैठक आज श्री. अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षामध्ये आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

            नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी (योजना) सय्यद राजीक सय्यद गफ्फार यांनी प्रारंभी माहिती दिली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, जिल्हा व्यवसाय व कौशल्य विकास अधिकारी प्रांजली बारस्कर, डायट प्रतिनिधी विजय शिंदे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य एन.जी. देशमुख, जिल्हा सांख्यिकी अधिकारी संजय काळमेघ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर.एस. राऊत, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बुध्दभुषण सोनोने, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल कोल्हे, सहायक योजना अधिकारी प्रीतम गणगणे यावेळी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील एकूण निरक्षरांची संख्या 47 हजार 540 इतकी नोंदविली असून जिल्ह्यासाठी शासनाने 5 वर्षांसाठी एकूण उद्दिष्ट 3 लक्ष 6 हजार 800 एवढे दिले आहे. कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वेक्षण करावे. सर्व संबंधित यंत्रणेने पूर्ण क्षमतेने कार्य करुन योजना यशस्वी करण्याचे आवाहन श्री. पंडा यांनी यावेळी केले.

            यावेळी नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे स्वरुप, सहभागी यंत्रणा खर्च, तरतूद, यंत्रणांची जबाबदारी याबद्दल माहिती देण्यात आली. ही योजना राज्यात प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यात सन 2022-23 ला सुरु झाली. तसेच पूर्ण राज्यात या वर्षापासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत 15 ते 35 वयोगटातील निरक्षरांना साक्षर करावयाचे आहे. 

या कार्यक्रमांतर्गत 10 निरक्षरांना एक स्वयंसेवक साक्षर करणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 1 हजार 820 स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहे.  स्वयंसेवक कमीत-कमी 8 वा वर्ग शिकलेला असावा. या निरक्षरांचे सर्वेक्षण प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षक करणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, माता-पालक संघ, बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, समाजसेवक तसेच राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घेण्यात येईल. या योजनेचा निरक्षरांना लिहिता- वाचता येणे, दैनंदिन व्यवहारातील हिशोब येणे, डिजीटल साधनांचा उपयोग करण्यास सक्षम करणे हा उद्देश आहे. 

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती