प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

 





येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी

नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

जिल्ह्यात 2 हजार 664 मतदार केंद्रे

 

            अमरावती, दि. 27 (जिमाका): लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविल्या जातो. आज दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित करून यंदाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे.            दि. 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण-तरूणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल, मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या-त्या तारखेला पूर्ण करण्यात येईल.

सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन श्री. कटियार यांनी केले.

            प्रारूप यादीत आपल्या नावाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. यासाठी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील अचूक आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. 8 भरावा. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबधी हरकतही घेता येते. एखाद्या मतदारसंघातील मतदार यादीत दिलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अशा नावाबाबत त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

            समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जातीसाठी 14, जमातीसाठी 19, सेक्स वर्करसाठी 1, तृतीयपंथी व्यक्ती 1, दिव्यांगासाठी 10, विद्यार्थ्यांसाठी 18 असे एकूण 64 शिबिरे घेण्यात आली असून या शिबिरामध्ये एकूण 3 हजार 744 अर्ज नवीन मतदार नोंदणीसाठी प्राप्त झाले. तसेच 12 हजार 259 दिव्यांगाना मतदार यादीत चिन्हांकित करण्यात आले. बीएलओ यांचे मार्फत व्हीआयपी व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांना चिन्हांकित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व यापुढे दि. 4 व 5 नोव्हेंबर तसेच 25 व 26 नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत विशेष शिबिर मोहिम राबविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणीसाठी महिला मेळावे, बचतगट, महिला व बाल विकास विभाग यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तर दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येक बीएलओ यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे. त्यामध्ये मयतांची संख्या 25 हजार 882, स्थलांतरीत 17 हजार 770, अनुपस्थिती 27 हजार 60 नावे आढळून आली आहेत. आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत बीएलओमार्फत नमुना 7 व 8 चे फार्म भरून घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

            पारधी, फासे पारधी, नाथ जोगी, गोसावी, धनगर, अशा विमुक्त भटक्याजमाती या समाजघटकाकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्राची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतेही कागदपत्रे नसले तरी मतदार नोंदणी करू शकणार आहेत.

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने विशेष ग्रामसभेचे आयोजन आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार आहे. या काळात ग्रामसभेचे मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्याअंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावाची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

            दि. 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरूष मतदारसंख्या 12 लक्ष 38 हजार 044, स्त्री मतदार संख्या 11 लक्ष 62 हजार 536 व तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकुण 24 लक्ष 662 होती. तर दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरूष मतदार संख्या 12 लक्ष 33 हजार 378 आहे. स्त्री मतदारांची संख्या 11 लक्ष 59 हजार 157 तर तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकूण मतदार संख्या 23 लक्ष 92 हजार 617 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 664 मतदान केंद्रे आहेत.

            भारत हा तरूणाचा देश आहे. त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पुरस्काराचे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

           नवमतदार व ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in व ceo.maharashtra.gov.in चा वापर करावा किंवा जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरावा किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले आहे.

            मतदार यादीची प्रसिध्दी आज, दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यामध्ये सर्वत्र केली आहे. मतदार यादी प्रकाशनाबाबत सविस्तर माहिती अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, महसूल उप जिल्हाधिकारी रणजीत भोसले, निवडणूक नायब तहसीलदार प्रविण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

 

***

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती