जिल्हा स्त्री रुग्णालयातील आरोग्य सोयीसुविधांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्या-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 जिल्हा स्त्री रुग्णालयातील आरोग्य सोयीसुविधांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी;

रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्या-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

         अमरावती, दि. 6 : जिल्हा स्त्री रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, संबधित विभागाने नियमित रुग्णांना भेट देऊन त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचार, सेवा-सुविधेबाबत विचारणा करावी. रुग्णांना औषधे व उपचाराअभावी त्रास होणार नाही याची संबधितांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

 

          जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी आज सकाळी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देऊन येथील आरोग्य सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच रुग्णालयातील औषधांचा साठा, वैद्यकीय उपचार यंत्र, संसाधन, बाह्य व आंतर रुग्ण कक्षातील(ओपीडी-आयपीडी) रुग्ण संख्या, वैद्यकीय उपकरणांची सद्यस्थिती, डॉक्टर्स व परिचारिकांची संख्या, सुरक्षा रक्षक, वार्डातील रुग्णांची सद्यस्थिती, प्रसुती व शिशू अतिदक्षता व ओपीडी कक्षातील सोयीसुविधेबाबत सविस्तर आढावा घेतला. आयसीयु व ओपीडीतील रुग्णांशी संवाद साधून उपचार व सोयीसुविधेबाबत श्री. कटियार यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी मनपा आयुक्त देवीदास पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. सोळंके, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण साळूंखे आदी उपस्थित होते.

 

          श्री. कटियार म्हणाले की, रुग्णांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनामार्फत सर्तकता बाळगण्यात यावी. यासाठी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय उपकरण-यंत्रे, वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ नियमितपणे सेवेत उपलब्ध ठेवावे. रुग्णालय व रुग्णालयाचा परिसरात नियमितपणे स्वच्छता ठेवावी. रुग्णालयातील ड्रेनेज सिस्टीम तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी. शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा रुग्णालयात नियमित उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कार्यवाही करावी. मनुष्यबळ कमी असल्यास कंत्राटीपद्धतीने पदे भरुन कामे करावे. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही. तसेच रुग्णांवर त्वरित उपचार सुरु व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती