अमरावती जिल्ह्यातील 15 कौशल्य केंद्रांची ग्रामीण भागात सुरुवात जुना धामणगाव येथून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ







अमरावती जिल्ह्यातील 15 कौशल्य केंद्रांची ग्रामीण भागात सुरुवात

जुना धामणगाव येथून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

प्रधानमंत्री यांच्या हस्ते ‘प्रमोद महाजन ग्रामीण

कौशल्य विकास केंद्रा’चे राज्यस्तरीय ऑनलाईन उद्घाटन

अमरावती जिल्ह्यात 3 प्रशिक्षण संस्थांव्दारे 15 केंद्रांवर तीन

वर्षामध्ये साडेचार हजार व्यक्तींना प्रशिक्षण देणार


अमरावती, दि.19 (जिमाका): राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील 350 तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज राज्यातील एकूण 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ झाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव येथून जिल्हाधिकारी सौरभ कटियार दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा’साठी अमरावती जिल्ह्यातील 15 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या केंद्रामधील अचलपूर तालुक्यातील कांडली येथून खासदार डॉ. अनिल बोंडे, चांदूररेल्वे येथील आमला विश्वेश्वर येथून आमदार प्रताप अडसड, धारणी तालुक्यातील दिया येथून आमदार राजकुमार पटेल, नांदगाव पेठ येथून प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार, भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर येथून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा तसेच विविध केंद्रावरुन पदाधिकारी उपस्थित होते.

दूरदृष्य प्रणालीव्दारे पंतप्रधान श्री. मोदी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. शासनामार्फत युवकांसाठी प्रशिक्षण आणि संधीच्या दृष्टीने आगळी संकल्पना सुरु करीत आहोत. जगभरात भारतातील प्रशिक्षित तरुणांना मागणी आहे. अन्य देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढते आहे. एका सर्व्हेक्षणानुसार जगभरातील 16 देशांमध्ये 40 लाख प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा युवकांना या देशांमध्ये बांधकाम, आरोग्य, पर्यटन, आदरातिथ्य, शिक्षण आणि परिवहन अशा क्षेत्रात मोठी मागणी आहे. अशा कौशल्य विकास प्रशिक्षणातून आपण केवळ भारतासाठी नाहीतर, अशा देशांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक-युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी व त्यांच्यामध्ये उद्योजक निर्माण होण्यासाठी सतत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात. ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ जिल्ह्यातील 15 केंद्रांना आजपासून सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात 3 प्रशिक्षण संस्थांव्दारे 15 केंद्रांवर तीन वर्षामध्ये साडेचार हजार व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये पीपल ट्री व्हेंचर प्रा.लि., अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था तसेच श्री श्री रुलर डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट या तीन संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगारावरील राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुक्यातील 15 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी जॉबरोल्सची निवड करताना अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात लागणाऱ्या उद्योजकता कौशल्याची गरज लक्षात घेऊन कौशल्य उद्योजकता व नाविण्यता, रोजगार जिल्हा कार्यकारी समितीमधील सर्व सदस्यांव्दारे मान्यता घेऊन जॉबरोल्स निवडण्यात आले आहे. या कौशल्य विकास केंद्रामुळे ग्रामीण युवक रोजगार व उद्योजकतेत आत्मनिर्भर होणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेसाठी उपयुक्त संरचनेचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसेच कृषी पूरक पारंपारिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षणाचाही यात समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रोजगाराला चालना मिळेल आणि स्थानिक उद्योगांना स्थानिक पातळीवरच आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होईल. यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले.  

जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडली, अमरावती येथील नांदगाव पेठ, अंजणगाव सूर्जी येथील कापूसतळणी, भातकूली येथील पूर्णा नगर, चांदूर रेल्वे येथील आमला विश्वेश्वर, चांदुरबाजार येथील  करजगाव, दर्यापूर येथील येवदा, धामणगाव रेल्वे येथील जुना धामनगाव, धारणी येथील दिया, मोर्शी येथील हिवरखेड, नांदगाव खंडेश्वर येथील लोणी, तिवसा येथील मोझरी, वरुड येथील जरुड व लोणी तसेच चिखलदार तालुक्यातील टेंभूरसोडा येथे कौशल्य केंद्रे आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

जुना धामणगावचे सरपंच विश्वेश्वर दिघाडे, धामणगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र चांडक, तहसीलदार गोविंद वाकोडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, ग्रामविकास अधिकारी आर.बी. आहेरवार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक रोहित मुंढे आदी उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तसेच महाविद्यालयांचे विद्यार्थी, गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती