मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना

                                                     










मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत

अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना

अमरावती, दि. 25 (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत 'अमृत कलश यात्रा ' उपक्रम अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावातून संकलित करण्यात आलेल्या 14 तालुक्यातील मातीचे 14 माती कलश मुख्यालयाच्या ठिकाणी एकत्रित करुन मुंबई व तेथून दिल्लीला पाठविण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

           दि. 1 सप्टेंबर पासून जिल्ह्यात ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायत मधील 1 हजार 566 गावांमधून माती गोळा करुन तालुकास्तरावर माती कलश तयार करण्यात आले. सर्व 14 तालुक्याचे ठिकाणी वाजत-गाजत अमृत कलश यात्रा काढण्यात आली.

            तालुक्यावर संकलित करण्यात आलेल्या मातीचे अमृत कलश मुंबईला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी पाठविण्यासाठी आज जिल्हा परिषद प्रांगणात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रताप अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीसह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, विकास उपायुक्त राजीव खडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा ग्रामीण विकास योजना प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, पंचायत तथा सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीष धायगुडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके तसेच सर्व विभाग प्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुकास्तरावरील अमृत कलश जिल्हास्तरावर संकलन करणे, वाजत गाजत अमृत कलश यात्रा काढून मुंबईसाठी रवाना करणे इत्यादी उपक्रमाचा समावेश होता.

             आज 14 तालुक्यातील 14 माती कलश घेऊन 28 स्वयंसेवक व एक जिल्हा समन्वयक मुंबईसाठी रवाना झाले. जिल्हा समन्वयक, जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर असून 28 स्वयंसेवक हे नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी आहेत. शुक्रवार, दि. 27 ऑक्टोबरला मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि त्याच दिवशी 4 ते 6 वाजेदरम्यान राज्यातील सर्व स्वयंसेवक कलश घेऊन विशेष रेल्वेने दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा देशव्यापी समारोपीय कार्यक्रम मंगळवार, दि. 31 ऑक्टोबर दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

            या जिल्हास्तरीय कार्यक्रमात तालुकास्तरावरील अमृत कलशाचे पूजन करण्यात येऊन अमृत कलश मुंबईसाठी रवाना झाले .

*****


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती