मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 : 

विमा क्षेत्रातील धोरणाबाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार
महाराष्ट्रात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 20 : देशात सर्वाधिक 50 टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात असून नवीन धोरणामुळे ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणातवाढेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणूकदारांच्या राउंड टेबल चर्चेदरम्यान केली.
  महाराष्ट्रातील युकेच्या उद्योगांना येणाऱ्या समस्याबाबत आपण मोकळेपणाने सांगितले त्याबद्दल आपले आभार. आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल यासाठी नोडल अधिकारी नेमला जाईल. असे मुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, उद्योग विभागाचे आयुक्त हर्षदीप  कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व युकेच्या  शिष्ठमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
ब्रिटिश उच्च हाय कमिशन उप-उच्चायुक्त क्रिस्पिन सायमन यांच्या नेतृत्वात विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राउंड टेबल चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
डाटा सेंटर धोरणात केंद्र सरकार बदल आणत असून याचा लाभ परकीय गुंतवणूक वाढण्यासाठी होईल, असे ते म्हणाले. विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी असून या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पार्किसन कंपनीच्या राज्यातील कामाचे मुख्यमंत्री यांनी कौतुक केले.
उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी टाटाच्या सहकार्याने नागपूर आणि पुणे येथे कौशल्य विकास केंद उभारले जात आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पूरक वातावरण आहे. त्यामुळे परदेशी उद्योग या ठिकाणी येण्यास उत्सुक असतात असे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले. मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेच्या निमित्ताने राज्याने पुन्हा एकदा आपला उद्योगाप्रती सकारात्मक दृष्टिकोन जगासमोर ठेवला आहे.महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सुरक्षित राज्य असून महाराष्ट्राची बाजारपेठ आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. ‘मेक इन इंडिया’मुळे आमच्या उद्योग व्यवसायाला बळकटी मिळाली असल्याचे अनेक सदस्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे उद्योग धोरण उद्योगांना पूरक आहे, असे मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेचे सर्वच सदस्यांनी कौतुक केले. या परिषदेचा गुंतवणूक वाढीसाठी लाभ होईल असा आशावाद शिष्टमंडळाने व्यक्त केला.
दळणवळण सुविधांचा विस्तार
मुंबई पुणे चाकण यासह संपूर्ण राज्यात दळणवळण सुविधांचा विस्तार केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्रान्स च्या शिष्टमंडळाला दिली. आयएफसीसीआय च्या सेक्रेटरी जनरल पायल कन्व्हर यांच्या नेतृत्वात फ्रान्सच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज राउंड टेबल चर्चा केली.  नवी मुंबई विमानतळावरून पहिले विमान डिसेंबर 2019 ला उड्डाण करेल असे मुख्यमंत्री म्हणाले. नवीन पुणे विमानतळाला परवानगी मिळाली असून लवकरच काम सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे आता असलेल्या विमानतळाचा विस्तार करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या सर्व परवानग्या ऑनलाइन करण्यात आल्या आहे. अर्ज केल्यानंतर निर्धारित वेळेत परवानगी प्राप्त न झाल्यास अर्जाची पावतीच परवानगी मानली जाईल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. एमआयडीसी मधील उद्योगासाठी असलेली जमीन हस्तांतरण प्रक्रिया अधिक सोपी व सुरळीत करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही  दिवसात सरकारने 30 नवीन धोरणे तयार केली असून ती अधिक पारदर्शक आहेत. महानगरात मेट्रोचे जाळे तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. सोबतच जल वाहतूक सुरू करण्यावर भर दिला जणार आहे. या सगळ्या सुविधा सिंगल तिकीट असतील. पुढील दोन वर्षात पुण्यात 600 ई-बसेस धावतील. त्याचप्रमाणे एक्सप्रेस हायवे उभारले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य हे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सक्षम केले जाणार आहे. आपण जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात करावी असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईत आर्थिक सुविधा केंद्र उभारणार
महाराष्ट्रात जास्तीतजास्त गुंतवणूक यावी व गुंतवणूकदारांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी मुंबई येथे आर्थिक सुविधा केंद्र उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमेरिकेचे उच्चायुक्त सी.जी. कॅगन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज राउंड टेबल चर्चा केली. मुंबईमध्ये एकात्मिक दळणवळण सुविधा प्रस्तावित असून, यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल. राज्य शासन गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यास नेहमी तयार राहील. उद्योगांसाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा तात्काळ पुरविण्यावर शासनाचा भर आहे. सर्व परवाणग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र च्या निमित्ताने जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात करावी असे अवाहन मुख्यंमत्री यांनी केले यावेळी अमेरिकन शिष्टमंडळाने गुंतवणुकीबाबत व सुविधांबाबत चर्चा केली. पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, आर्थिक सुविधा केंद्र, दळणवळण आदी विषयांवर त्यांनी आपली मते व्यक्त केली.
000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती