महाराष्ट्रात उद्योगाला पूरक वातावरण
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोणत्याही क्षेत्रात गुंतवणुकीस युएईचे गुंतवणूक शिष्टमंडळ इच्छुक
मुंबई, दि. 8: महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या खूप संधी आहेत. चांगल्या पायाभूत सुविधा असल्याने जगभरातील गुंतवणूकदार व विविध कंपन्याही महाराष्ट्रालाच पहिली पसंती देत आहेत, तुम्ही कोणताही उद्योग सुरु करा, आपले स्वागत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त अरब अमिरातच्या गुंतवणूक शिष्टमंडळाला सांगितले. दरम्यान, कोणत्याही क्षेत्रात गुंतवणुकीस इच्छुक असल्याचे अबुधाबी युएईचे (संयुक्त अरब अमिरात) आर्थिक विकास विभागाचे चेअरमन सैफ मोहम्मद अलिहजेरी यांनी स्पष्ट केले.
श्री. अलिहजेरी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने गुरूवारी (दि.8) मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, अबुधाबी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मोहम्मद थानी मुरशद अल रूमैथी, अबुधाबी गव्हर्मेंट कम्युनिकेशनचे प्रकल्प व्यवस्थापक मुबारक अब्दुल्ला अल अमेरी, लुलू इंटरनॅशनल एक्सचेंजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक युसूफ अली एम.ए., अदिब अहमद, चेंबरचे महासंचालक मोहम्मद एच. अल मुहेरी, अबुधाबीचे राजदूत डॉ. अहमद अल्बाना, वाणिज्यदूत अहमद सुल्तान अल्फलाही आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात होत असलेली कामे व योजनांची माहिती दिली. महाराष्ट्र हे इन्वेस्टमेंट डेस्टिनेशनआहे. मुंबई, नागपूर व पुणे येथे मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईत सुमारे 15मिलियन डॉलरची विविध प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शिवाय आणखी 10 मिलियन डॉलरची कामे प्रस्तावित आहेत. सुपर एक्सप्रेस वे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रोच्या कामांची माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्रात उद्योगांना चालना मिळावी म्हणून शासनाने उद्योगपूरक व गुंतवणूकदारांना फायदेशीर असे निर्णय घेतले आहेत. कोणत्याही क्षेत्रात आपण गुंतवणूक करा, महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबरोबरच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुंबई येथे 18 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्रची माहिती देऊन यात सहभागी होण्याचे आवाहनही
अबुधाबीच्या गुंतवणूकदारांना केले. 
आम्ही विविध उद्योगात गुंतवणूक करू इच्छितो. आम्हाला महाराष्ट्र तसेच मुंबईत हॉटेल, मॉल, पायाभूत सुविधा, फायनान्स, हौसिंग, ड्राय पोर्टमध्ये गुंतवणूक करायची आहे. शिवाय व्यवसायापेक्षा आम्हाला दोन्ही देशातील विशेषत: महाराष्ट्राशी संबंध दृढ करायचे आहेत, असे श्री.अलिहजेरी म्हणाले. त्यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कामांचे कौतुक केले. त्यांनी भारतामध्ये अबुधाबी विकसाजरा करणार असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे प्रत्यक्ष काम करणारे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारीच आहेत, असे कौतुक अबुधाबी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. रूमैथी यांनी केले. गुंतवणुकीबाबतीत सामंजस्य करारापेक्षा थेट गुंतवणूकीवर भर राहील, असेही त्यांनी सांगितले.
००००



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती