Sunday, February 4, 2018

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन
        नव्या पिढीतून संशोधक घडविण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे
                                                                      -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती दि. 4 : संशोधनाला चालना मिळून देशाच्या विकासप्रक्रियेला गती मिळावी यासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नव्या पिढीतून संशोधक घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनीही मुलांच्या चिकित्सक वृत्तीला वाव देत योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले.
अमरावती व यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने ज्ञानमाता विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.  जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार श्रीकांत देशपांडे, जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती नंदिनीताई दरणे, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) निलीमा टाके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर. डी. तुरणकर, ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर अ. आरोक्य सामी, राष्ट्रीय संशोधन संस्थेचे मनीष भोयर आदी उपस्थित होते.
श्री. पोटे म्हणाले, विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळविण्यासाठी इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासारखे उपक्रम शासनाकडून राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांमधील कुतुहल टिकून राहावे म्हणून शिक्षक व पालकांनीही त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. माझ्या वर्गातून शिक्षित होणारा विद्यार्थी हा यशस्वी व्यक्ती व आदर्श नागरिक झाला पाहिजे, अशा ध्येयाने शिक्षकांनी अध्यापन केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनेक महत्वाचे निर्णय अमलात आणले आहेत. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करुन व्यवस्थापनावरील खर्च कमी करुन तो शैक्षणिक  बाबींवर खर्च करणे, असा शासनाचा प्रयत्न आहे. विज्ञानाचे प्रयोग सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनुदान देऊन प्रोत्साहित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रत्येकाने एका गरीब मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आवाहन मी अधिकारी व समाजातील मान्यवरांना केले होते. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळून आज हजारो मुले त्या माध्यमातून शिकत आहेत. लोकसहभागातून कामे कशी यशस्वी होतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले. 
श्री. गोंडाणे, आमदार श्री. देशपांडे, श्री. ढोमणे, श्रीमती दरणे यांनीही मनोगत व्यक्त केले. खरे विज्ञान चिकित्सेतून सुरु होते. त्यामुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतील या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा उपयोग करुन नवनवीन मॉडेल तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते, असे शिक्षण सभापती श्री. देशमुख यांनी सांगितले.
 या प्रदर्शनात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विद्यालयांतून सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले असून, त्यांना त्यासाठी शासनाकडून 10 हजार रुपये अनुदान देण्यात आले, असे श्रीमती टाके यांनी सांगितले. फादर सामी यांनी आभार मानले.
00000




No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...