Friday, February 9, 2018

मनोरा आमदार निवास प्रस्तावित इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण
आमदार निवासाची इमारत स्मार्ट व हरित
संकल्पनेवर आधारित करावी
- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 8 :मनोरा आमदार निवासच्या पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीसमोर आज विधिमंडळात प्रस्तावित इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. नवीन इमारती या स्मार्ट व ग्रीन संकल्पनेवर आधारित असाव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
            मनोरा आमदार निवासच्या ठिकाणी नवीन आमदार निवास इमारत उभारण्यासंदर्भात आज  पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीची बैठक विधिमंडळात समितीचे प्रमुख तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीचे सहप्रमुख विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलसार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, संजय दत्त, शरद रणपिसे, अनिल पवार, मुख्य सचिव सुमित मल्लिक, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आदी यावेळी उपस्थित होते.
            प्रस्तावित आमदार निवास इमारतीचा आराखड्याचे यावेळी वास्तू विशारद शशी प्रभू यांनी सादरीकरण केले. सध्याच्या जागेवर नवीन दोन इमारती उभारण्यात येणार असून त्यामध्ये आमदारांसाठी खोल्या, वाहनतळाची व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था, जिम, कॅफेटेरिया, तिकिट बुकिंगची सोय, दुकान आदींचा आवश्यक बाबींचा समावेश असणार आहे.
            प्रस्तावित आमदार निवास हे सेंट्रल एअरकंडिशनर, वायफाय सह सर्व सोयीसुविधानियुक्त असावे. तसेच हरित इमारत संकल्पनेचा वापर करावा. तसेच इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर व्हावे, यासाठी कोरियन तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच आमदार व कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक सोयीसुविधांचा अंतर्भाव यामध्ये करावा, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...