Tuesday, February 20, 2018


मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 :

महिला उद्योजक परिसंवाद
महिलांना उद्योग क्षेत्रात मोठा वाव
मुंबई, दि. 20 : देशाच्या उभारणीत महिला खूप मोठे योगदान देऊ शकतात, त्यासाठी त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर मोठे प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे मत महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. महिलांना उद्योग क्षेत्रात करीअर करावयाचे असल्यास त्यांनी स्वत:ला कोणत्याही पातळीवर कमी न समजता पूर्ण आत्मविश्वासाने आणि येणाऱ्या अडचणींचा सामना करत वाटचाल करणे गरजेचे आहे, असे मतही यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मॅग्नेटीक महाराष्ट्र परिषदेत आज यासंदर्भात आयोजित चर्चासत्रात कॅनडाच्या लघुउद्योग आणि पर्यटन मंत्री बर्दीश छग्गर, भारतातील स्विडीश चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रमुख सारा लार्सन, मेट्रोपॉलीस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमिरा शाह, मल्टिप्लेस अल्टर्नेट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक रेणुका रामनाथ, इस्त्रोच्या उप प्रकल्प संचालक मिनल संपथ, हे दिदीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती रॉय, ॲमेझॉन कंपनीच्या संचालक अर्चना वोरा यांनी सहभाग घेतला.
कॅनडाच्या लघुउद्योग आणि पर्यटन मंत्री बर्दीश छग्गर यावेळी म्हणाल्या, आपण समान आहोत अशी मानसिकता ठेवून महिलांनी आपापल्या क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारचा न्युनगंड न बाळगता वाटचाल केल्यास महिलांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळविणे अशक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
 भारतातील स्विडीश चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रमुख सारा लार्सन यावेळी म्हणाल्या, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिकता आणि मानसिकतेत बदल आणावा लागेल. महिला या उद्योजक किंवा एखाद्या संस्थेच्या प्रमुख किंवा नेत्या कशा बनू शकतील यासाठी हा बदल गरजेचा आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच हे होऊ शकणार आहे. महिलांसाठी विविध क्षेत्राच्या प्रशिक्षणावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
इस्त्रोच्या उप प्रकल्प संचालक मिनल संपथ यांनी यावेळी इस्त्रोमार्फत राबविण्यात आलेल्या मिशन मंगलयान मोहीमेविषयी माहिती दिली. या मोहिमेत महिला वैज्ञानिकांचा महत्वाचा सहभाग होता. सुमारे 40 महिला वैज्ञानिकांनी या मोहीमेच्या यशात योगदान दिले, असे त्यांनी सांगितले. महिलांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. युनेस्कोच्या सर्वेक्षणानुसार भारतात फक्त 14 टक्के इतक्या महिला संशोधक आहोत, जागतिक पातळीवर हे प्रमाण 28.4 टक्के इतके आहे. महिलांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहभाग वाढणे गरजेचे आहे. यशस्वी महिला उद्योजकांना रोल मॉडेल म्हणून शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून मुली आणि महिलांसमोर आणणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ‘दिदीच्या’ मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती रॉय यांनी सुरुवातीला स्वत: टॅक्सी चालक म्हणून काम सुरु केले. त्यावेळी टॅक्सी चालविण्याचे सोडून आपले घर सांभाळण्याचा सल्ला अनेकांनी दिला. महिला टॅक्सी चालवू शकत नाही हा मोठा गैरसमज असून तो दूर करण्यासाठी आपल्याला मोठे प्रयत्न करावे लागले, असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी वाहन चालविण्याच्या आवडीचे व्यवसायात रुपांतर केले. आतापर्यंत त्यांच्या कंपनीमार्फत सुमारे 2 हजार महिलांना टॅक्सी चालकाचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच ॲमेझॉन कंपनीच्या सहकार्यातून बेंगलोरमध्ये 200 महिला  या मोटारसायकलवर पार्सल डिलीव्हरी एजंट म्हणून काम करीत आहेत. आपल्या या यशस्वी व्यावसायिक वाटचालीत मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान राहीले. टॅक्सी ड्रायव्हर म्हणून आपण मुंबईतूनच या करीअरची सुरुवात केली, असे रेवती रॉय यांनी सांगितले. महिला उद्योजकांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
    ॲमेझॉन कंपनीच्या संचालक अर्चना वोरा यांनी त्यांच्या कंपनीमार्फत खास महिला उद्योजकांसाठी सुरु करण्यात आलेल्या ॲमेझॉन सहेली या ई -कॉमर्स पोर्टलविषयी माहिती दिली. या पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 20 हजार महिला व्यावसायिक निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे त्यांनी सांगितले.
 मल्टिप्लेस अल्टर्नेट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक रेणुका रामनाथ म्हणाल्या, करिअर आणि कुटुंब यांची सांगड घालताना महिलांची निश्चतच कसरत होते. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला कमी न समजता वाटचाल करावी. कामावरची निष्ठा, अखंड मेहनत, करिअरच्या क्षेत्रात निर्माण झालेल्याविश्वासावर महिला कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळवू शकते, असे त्या म्हणाल्या. महिलांसाठी उद्योजकता विषयक शिक्षण आणि प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
  मेट्रोपॉलिस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमिरा शाह यावेळी म्हणाल्या, उद्योग क्षेत्रात अनिश्चितता ही कायम असते. त्यामुळे उद्योग क्षेत्रात काम करावयाचे असल्यास अनिश्चिततेचे आव्हान असते. या क्षेत्रात सेफ्टी झोन नसतो, त्यामुळे हे महिलांचे क्षेत्र नाही असे नेहमी म्हटले जाते. पण अनेक महिलांनी आत्मविश्वासाने वाटचाल करीत आज उद्योग क्षेत्रातही भरारी घेतली आहे. महिलांच्या क्षमतासंदर्भात समाजात असलेले विविध गैरसमज दूर करणे गरजेचे आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...