Friday, February 23, 2018

बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियानाचा शुभारंभ
जिल्ह्यात 20 हजार नोंदणीचे उद्दिष्ट
अभियानातील 28 योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 23 : कामगार विभागातर्फे बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात 20 हजार नोंदणीचे उद्दिष्ट असून, ते पूर्ण करण्यात येईल, तसेच नोंदणी करुन यातील  विविध 28 योजनांचा कामगारांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.  
            कामगार विभागातर्फे बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियानाचा ई- शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाला. या कार्यक्रमात अमरावतीहून वेबकास्टद्वारे पर्यावरण राज्यमंत्री श्री. पोटे-पाटील, जिल्हाधिकारी अभिजित बांगर आदींनी सहभाग घेतला.  
उपायुक्त रमेश मावस्कर, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर आदीही उपस्थित होते. 
            अमरावती जिल्ह्यात नोंदणीसाठी सर्व तालुके व परिसराचा विचार करून सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात अभियान यशस्वीपणे राबविण्यात येईल, अशी माहिती श्री. पोटे- पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिली.  ही मोहिम २३ मार्चपर्यंत चालणार आहे.  कामगारांची नोंदणी करताना सर्व विभागांनी अभियानाला सहकार्य करावे तसेच 23 मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणावर कामगारांची नोंदणी कशी होईल, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

नोंदणी करण्याची सुलभ प्रक्रिया
18 ते 60 वर्ष वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त २५ रुपये नोंदणी फी भरून दरमहा १ रुपयाप्रमाणे पाच वर्षांसाठी ६० रुपये एवढी अत्यल्प वर्गणी कामगारांना भरणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे, रहिवासी पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, बँक पासबुकची सत्यप्रत या नोंदणीकरिता आवश्यक आहे.
इमारत व इतर बांधकाम (रोजगार,नियमन व सेवाशर्ती) अधिनियमातील मूळ व्याख्येत समाविष्ट 21 बांधकामावरील बांधकाम कामगारांनाही मंडळाकडे नोंदणी करून कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल. कामगारांना
 अपघात विमा संरक्षण, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती व अन्य सवलती अशा कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहेत.
  इमारत बांधकाम कामगारांनी विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी
• इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
• 18 ते 60 वर्षे वयोगटातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येणार
• इमारत व इतर बांधकाम (रोजगार, नियमन व सेवाशर्ती) अधिनियमातील मूळ व्याख्येत समाविष्ट 21  बांधकामावरील बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल.
• विविध योजनांचा लाभ मिळविताना नोंदणी फी 25 रुपये इतकी आहे. तर दरमहा वर्गणी 1 रुपया आणि 60 रुपये पाच वर्षांसाठी आहे.

नोंदणीकरिता लागणारी कागदपत्रे

• गेल्या वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
• वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्मप्रमाणपत्र)
• पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे
• रहिवासी पुरावा
• छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा
• बँक पासबुकची सत्यप्रत
लोकप्रतिनिधी, कामगार संघटना आणि आस्थापना, स्वयंसेवी संस्था, यांनी विशेष नोंदणी अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करण्यात सहकार्य करावे. तसेच विविध योजनांच्या लाभाकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...