चिखलदरा पर्यटन महोत्सवाची जबाबदारी ‘एमटीडीसी’कडे
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे
                  -जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश
अमरावती, दि.  5 :  जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने चिखलदरा महोत्सव महत्वपूर्ण असून, त्याच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
          महोत्सवाबाबत आढावा बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. चिखलद-याच्या नगराध्यक्ष विजया सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. सवई यांच्यासह जिल्हा परिषद, गृह, पर्यटन, वन, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे अधिकारी व चिखलदरा न. प. सदस्य उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले की, महोत्सवाची जबाबदारी यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासह  चिखलदरा नगरपरिषद, जिल्हा नियोजन अधिकारी व इतर यंत्रणांनी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी समन्वयपूर्वक नियोजन करावे. पर्यटन महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी अंदाजपत्रक सादर करावे. विविध कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवावी व स्थानिक, तसेच बाहेरील कंत्राटदारांसाठी प्रक्रिया खुली असावी. महोत्सवात स्थानिक आदिवासी बांधवांच्या कलाकृतींचा समावेश असावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
चिखलदरा नगरपालिकेकडून निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही केली जाईल.  जिल्हा माहिती कार्यालयाने महोत्सवाच्या प्रसिद्धीची जबाबदारी पाडावी, तसेच विविध विभागांच्या संकेतस्थळांवरही माहिती प्रसारित करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. महोत्सवात लोकनृत्य स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कवीसंमेलन, साहसी खेळ, नाईट ट्रेकिंग यांच्यासह पतंग महोत्सवाचे आयोजन करण्याचे व महोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत बस सुरु ठेवण्याचे एस. टी. महामंडळाला कळविण्याचे यावेळी ठरले. बैठकीला चिखलदरा येथील व्यावसायिक संघटना व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
                                                          00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती