भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्कृती विसरू नका
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. 21 :  जगभरातील सर्वाधिक तरुणांची  संख्‍या असणारा आपला देश आहे. तरुण हीच आपल्‍या देशाची शक्‍ती आहे, याच जोरावर भारत हा जगात महासत्‍ता होणार आहे, यासाठी भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्‍कृती विसरू नका,असे आवाहन मुख्‍यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी आज केले.
पुणे येथील सिंबायोसिस लॉ स्कूलच्‍या 'सिम्‍भव 2018' या दहाव्‍या आंतर-महाविद्यालयीन वार्षिक सांकृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुख्‍यमंत्री  श्री. फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍यावेळी ते बोलत होते. सिम्‍बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)चे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार अध्‍यक्षस्‍थानी होते. कार्यक्रमास सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, सिम्‍बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)च्‍या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिम्‍बॉयसिस लॉ स्‍कूलच्‍या संचालक डॉ. शशिकला गुर्पूर आदी उपस्थित होते.
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,वसुधैव कुटुंबकमही आपल्या देशाची संस्कृती आहे. शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरूवात भगिनींनो आणि  बंधूंनोअशी करून आपल्या संस्कृतीची ओळख जगाला करून दिली होती. आपल्या देशावर ग्रीक, शक, इंग्रज, पोर्तुगीज, डच, मुघल अशा अनेकांनी आक्रमणे केली. मात्र या आक्रमणानंतरही आपल्या देशाची संस्कृती टिकून आहे. आपल्या देशात असणाऱ्या ज्ञानामुळेच आपले जगातील स्थान टिकून आहे.
          अनेक नद्या एकत्र येवून ज्या प्रमाणे सुंदर समुद्र तयार होतो, त्याच प्रमाणे विविध श्रध्दा, संस्कृतींच्या मिश्रणाने आपली भारताची संस्कृती तयार झाली आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या नाविन्यपूर्ण सृजनशीलतेमुळे मोठे आर्थिक केंद्र म्हणून महाराष्ट्राचा विकास होणार आहे. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे. हीच आपल्या देशाची शक्ती आहे. या लोकसंख्येला कौशल्यतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून आपण आर्थिक क्षेत्रात मोठा विकास करू शकणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
          आता कृत्रिम बुध्दीमत्ता ही नवी संकल्पना जगात आली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आपण पाऊल टाकले आहे. या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे. भविष्याचा वेध घेणारेच पुढील काळात टिकणार आहेत. त्यामुळे भविष्यातील संधीसाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे. या बदलांसाठी तयार राहण्यासाठी आपल्या कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
          येत्या काळात न्यायिक क्षेत्रात मनुष्यबळाची मोठी आवश्यकता भासणार आहे. समाजात वाढणाऱ्या सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती असणारे कायदेतज्ज्ञ निर्माण होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
          डॉ. शां. बं. मुजूमदार म्हणाले, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हे तर इंडीयन टॅलेंट असे नमूद करून महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी या टॅलेंटचा लाभ घ्यायला हवा. मॅग्नेटिक महाराष्ट्रचे  आयोजन करून देश आणि विदेशातील गुंतवणुकदारांना निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
          यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विमानतळासमोरील मार्गाच्या सिंम्बॉयसिस मार्गया फलकाचे उद्घाटन झाले.
सिम्‍भव 18’ चे आयोजक कार्तिकेय चौहान यांनी सिंम्भवची संकल्पना स्पष्ट करून आयोजनाचा हेतू विशद केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉ स्कूलच्या संचालक डॉ. शशिकला गुर्पूर यांनी केले. आभार सिम्‍बॉयसिस इंटरनॅशनलचे (अभिमत विद्यापीठ) कुलगुरू डॉ. रजनी गुप्‍ते यांनी मानले.

महामित्रजनतेला जोडणारा प्लॅटफॉर्म...
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रशांत गुप्ता या विद्यार्थ्याने महामित्रच्या उपयुक्ततेबाबत प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महामित्र हा डिजीटल प्लॅटफॉर्म लोकांना एकत्र आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आपण लोकशाही मानणारे आहोत त्यामुळे राज्याच्या विकास प्रक्रीयेत नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी महामित्र हा उपक्रम उपयुक्त असून या निमित्ताने राज्यातील जनतेला बरोबर घेतले जाणार आहे.
या शिवाय पुणे मेट्रो, बसची कनेक्टीविटी, मुंबईतील मेट्रो,मोनोरेल, जलवाहतुक आदी प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.
०००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती