Sunday, March 18, 2018

जिल्हा कृषी महोत्सवाला वाढता प्रतिसाद
बचत गटांच्या सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी

*सेंद्रिय शेतीमाल धान्य बाजार
*खाद्य महोत्सवात विविध पदार्थांना मागणी
*शेतकरी बचत गटांच्या वस्तूंची विक्री
*गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे स्वतंत्र कक्ष

अमरावती, दि. 18 : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदानावर आयोजित भव्य जिल्हा कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतक-यांसह नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दोन दिवसांतच विविध बचत गटांच्या सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी होती.
'शेतकरी ते थेट ग्राहक' अशी संकल्पना असलेल्या विविध बचत गटांच्या कक्षातून जिल्ह्यातील काळ्या कसदार मातीत निर्माण झालेली सेंद्रिय उत्पादने या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे. पहिल्याच दिवशी महोत्सवात तूर, उडीद, हरभरा आदी डाळी, हळद, भाजीपाला आदी सेंद्रिय उत्पादनांचा चांगला खप झाला. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर अनेक नागरिकांनी नववर्षाची खरेदी सेंद्रिय उत्पादनांपासून सुरु करण्यास पसंती दिली.
 कडधान्यांसह गटांच्या गुळ, हळद, खाद्यतेल व  विविध लोणची, पापड आदी पदार्थांनाही मोठी मागणी आहे. महोत्सवात थेट विक्रीची संधी मिळाल्याने भाजीपाल्याला चांगला भाव मिळाला आणि ग्राहकांनाही रास्त दरात भाजीपाला मिळू शकला, अशी माहिती वाढोणा (अचलपूर) येथील गजानन सेंद्रिय शेती उत्पादक गटाचे बाळकृष्ण धांडे यांनी दिली.
बहादूरपूर, अंजनगाव बारी अशा विविध गावांतून आलेल्या शेतक-यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाधारे पिकवलेली ब्रोकोली, वॉटर ॲपल, तेजपान आदी मसाला, लाल केळी आदी नवी पीके व उत्पादने महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे. रेशीम उद्योग, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, पशुसंवर्धन, पूरक व प्रक्रिया उद्योग, मत्स्योद्योग, शेतक-यांसाठीच्या योजनांची माहिती शासनांच्या विविध कक्षांतून मिळत आहे. मशागत व सिंचनासाठीचे अद्ययावत तंत्रज्ञान व यंत्रे विविध संस्थांच्या कक्षात पहावयास मिळत असल्याने महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे.  
     महोत्सवात शेतक-यांना गटशेती, नियंत्रित शेतीचे व्यवस्थापन, कृषीनिविष्ठा, सिंचन साधने व तंत्रज्ञान, विविध कृषी अवजारे व यंत्रे, शेतमाल आधारित प्रक्रिया उद्योग व निर्यात, कृषीविषयक साहित्य, पशुसंवर्धन, विपणन आदी विविध विषयांवर माहिती दिली जात आहे. त्याशिवाय, संत्रा, कापूस, कांदा व भाजीपाला पीकांविषयी स्वतंत्र परिसंवाद आहेत. महोत्सव दि. 21 मार्चपर्यंत सुरु आहे. त्याचा शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान व ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक ए. के. मिसाळ यांनी केले आहे.  विविध शासकीय विभागांसह विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या कक्षांचाही महोत्सवात समावेश आहे.   
00000







No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...