Thursday, March 29, 2018

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा विभागीय मेळावा
कर्मचा-यांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम करावे
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 29 : राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविताना वंचितांना लाभ मिळवून देण्यासाठी कर्मचा-यांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.  
कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित विभागीय मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.  जिल्हाधिकारी अभिजित बांगर, आदिवासी विकास उपायुक्त नितीन तायडे, महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, एल. जे. वानखडे, पी. बी. इंगळे आदी उपस्थित होते.  
श्री. पोटे- पाटील म्हणाले की,  कर्मचा-यांनी हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव जोपासली पाहिजे. महाराष्ट्राचा प्रशासनावर होणारा खर्च हा मध्यप्रदेशच्या तुलनेत वीस टक्क्यांनी अधिक आहे. जनसामान्यांकडून मिळणा-या करातूनच प्रशासनावरचा खर्च होतो. त्यामुळे सामाजिक बांधीलकीतून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याची आपली जबाबदारी कसोशीने पाळली पाहिजे. कर्मचा-यांचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
  गरीब घरातील मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी  म्हणून अधिकारी- कर्मचारी यांनी एका मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.   
श्री. बांगर म्हणाले की, संघटनेमार्फत कर्मचा-यांच्या समस्यांना वाचा फोडण्याबरोबरच अनेक विधायक उपक्रमही उत्तमरीत्या चालविले जातात. कर्मचा-यांनी कार्यालयीन कर्तव्ये पार पाडण्याबरोबरच एक जागरूक नागरिक म्हणून वंचित, गरजूंप्रती संवेदनशीलता जोपासली पाहिजे.
श्री. इंगळे यांनी आपल्या मनोगतातून संघटनेची वाटचाल व कामकाजाबाबत माहिती दिली.
  
00000



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...