Monday, March 19, 2018

जिल्हा कृषी महोत्सवात संत्रा पीक व दुग्धोत्पादनाबाबत मार्गदर्शन
तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून दुग्धोत्पादन व्यवसाय फायदेशीर
            -डॉ. जी. बी. देशमुख

-तज्ज्ञांचा शेतक-यांशी संवाद
अमरावती, दि. 19 : जनावरांची निगा, उत्तम चा-याची लागवड,  दुधविक्रीसह दुधाच्या मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती याबाबत तंत्रशुद्ध व्यवस्थापन केल्यास दुग्धोत्पादन व्यवसाय फायदेशीर ठरतो. हा व्यवसाय शेती क्षेत्राला आधार ठरणारा आहे, असे पशुआहारतज्ज्ञ डॉ. जी. बी. देशमुख यांनी आज येथे सांगितले.
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदानावर आयोजित भव्य जिल्हा कृषी महोत्सवात शेतक-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक ए. के. मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
            श्री. देशमुख म्हणाले की,  मूल्यवर्धित उत्पादने फायदेशीर असल्याने दुग्धोत्पादक शेतक-यांनी  दही, खवा, तूप अशा पदार्थांच्या निर्मितीकडेही वळावे. म्हशीच्या मु-हा, मेहसाणा, जाफराबादीसह आपल्या परिसरातील अचलपुरी, नागपुरी या जातीही दुधासाठी चांगल्या आहेत. चा-याची टंचाई सार्वत्रिक आहे. त्यामुळे शेतीच्या एक दशांश जमीन तरी चारापीकांसाठी राखली पाहिजे. डीएचएन- सिक्स नेपियन गवताच्या सहा कापण्या मिळतात. त्यात चवळीचेही पीक घेऊन एकत्रित कापणी करता येते. या द्विदल वनस्पतीपासून प्रथिने व एकदल वनस्पतीपासून ऊर्जा मिळून जनावरे सुदृढ होतात. केवळ खरीप पीके घेणा-यांनी खरीप हंगामानंतर चारा पीके घेण्याचा प्रयत्न करावा.  
चा-याची कुटी करुन जनावराला द्यावी जेणेकरुन चा-याचा पुरेपूर उपयोग होईल व जनावरांची पचनीयता वाढते. शासनाने कुटी यंत्रावर 8 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते, अशी माहिती डॉ. रहाटे यांनी दिली.
            वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. आर. एस. वानखडे यांनी संत्रा बहार व्यवस्थापनाबाबत व कृषी तज्ज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी संत्रावरील प्रमुख किडींचे व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.
मंगळवारी खरेदीदार- विक्रेता संमेलन
महोत्सवात उद्या (दि. 20) शेतकरी उत्पादक कंपनी विपणन व व्यवस्थापनांतर्गत खरेदीदार- विक्रेता संमेलन सकाळी 10 वाजता होईल. या संमेलनात टाटा रॅलीज, मदर डेअरी, सुमितंर इं., श्रावणी ॲग्रो, जैन स्वीट ऑरेंज आदी नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.  त्याचप्रमाणे, दु. 12 वाजता वरिष्ठ ॲग्रॉनॉमिस्ट डॉ. अनिल पाटील यांचे जैन स्वीट ऑरेंज लागवड आणि दु. 3. 30 वाजता जलसंधारण तज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांचे पाणलोट व्यवस्थापनाविषयी व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान व ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक श्री. मिसाळ यांनी केले आहे.
बचत गटांना मोठा प्रतिसाद
  महोत्सवातील बचत गटांच्या डाळ, धान्य आदी सेंद्रिय उत्पादनांसह मध, गूळ, कडकनाथ अंडी आदी पदार्थांना आज मोठी मागणी राहिली. कृषी तंत्रज्ञान, पशुसंवर्धन याबाबत विविध कक्ष उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.  हा महोत्सव 21 मार्चपर्यंत चालणार आहे.
00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...