क्रीडा क्षेत्राला उत्कृष्ट पायाभूत सुविधा
उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील
                                         - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 24: खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन क्रीडा क्षेत्राला उत्कृष्ठ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून क्रीडा संघटनांचाही प्राधान्याने उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचा दृष्टिकोन असावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाणेफेक करुन शिवाजी पार्क जिमखानातर्फे (एसपीजी) शिवाजी पार्क (दादर) येथे आयोजित स्व. विजय मांजरेकर- रमाकांत देसाई टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्याचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सदानंद सरवणकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, शिवाजी पार्क जिमखान्याचे (एसपीजी) अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक श्रीमती विशाखा राऊत, संदीप देशपांडे, एसपीजी चे व्यवस्थापकीय विश्वस्त अनिरुद्ध जोशी, चेअरमन अविनाश कामत, प्रसिद्ध माजी रणजीपटू पद्माकर शिवलकर आदी उपस्थित होते.
            खेळ देखील महत्वपूर्ण करीअर संधी आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात 10 वी, 12 वी पर्यंत मुलांना खेळाला पालकांकडून परवानगी दिली जाते. पुढे खेळामध्ये आयुष्य घडविण्यासाठी संधी नसल्याच्या समजातून पालक मुलांना केवळ अभ्यासात गुंतवूण टाकतात. हे चित्र बदलण्यासाठी शासनाकडूनही खेळाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने अनेक सोयी सुविधा पुरविल्या आहेत. मात्र अजून खूप काही करण्याची गरज आहे.
            ते पुढे म्हणाले की, खेळाला महत्त्व प्राप्त करुन देण्यासाठीराज्यातील बालेवाडी तसेच अन्य क्रीडा संकूल आणि खेळ सुविधांचा कार्यक्षम उपयोग व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. क्रीडा संघटनांनीही केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न बाळगता खेळ आणि खेळाडूंना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे.
            मुख्यमंत्री म्हणाले की, 109 वर्षाचा गौरवपूर्ण इतिहास असलेली एसपीजी ही क्रीडा संघटना खेळाला जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील तसेच अन्य खेळातील उत्कृष्ट खेळाडू दिलेली नामांकीत संस्था आहे. स्व. विजय मांजरेकर आणि रमाकांत आचरेकर यांनी भारतीय क्रिकेटच्या आव्हानात्मक काळात देशाला जागतिक क्रिकेटमध्ये नाव मिळवून देण्याचे काम केले. त्यांच्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला उपस्थित राहून आपल्याला खूप आनंद झाला आहे.
            यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना एसपीजी चे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संदीप पाटील क्रिकेट शिष्यवृत्ती आणि दादा खानोलकर टेनिस शिष्यवृत्ती प्रत्येकी 3 युवा खेळाडूंना प्रदान करण्यात आली.
0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती