संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्माकोल बंदीची अधिसूचना लागू
-पर्यावरण मंत्री रामदास कदम

मुंबई, दि. 24 : संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्माकोल बंदी बाबतची अधिसूचना लागू केल्याची माहिती आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात दिली.
श्री.कदम यांनी सांगितले की, राज्यातून 1800 टन प्लास्टिक कचरा रोज निर्माण होतो. लाखो टन कचरा रस्त्याच्या आजुबाजूला दिसतो. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. श्वसनाचे, कॅन्सरसारखे आजार होत आहेत. लग्न आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलवर बंदी आहे. छोट्या पिण्याच्या पाणी बॉटलवर पूर्ण बंदी असून मोठ्या बॉटल बंदीसाठी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे.
ज्यांच्याकडे थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वस्तुंचा साठा आहे त्यांनी मागणी केल्यास काही कालावधी वाढवून देण्यात येणार आहे. या उद्योगात काम करणाऱ्या हजारो कामगारांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येणार असून त्यांचाही रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय देण्याबाबत सांगताना श्री.कदम म्हणाले, महिला बचतगटांनी कापडी पिशव्यांचे उत्पादन सुरु केले आहे. त्यांना पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत. लवकरच कापडी पिशव्या बाजारात येणार आहेत. नाविण्यपूर्ण योजनेतून प्रत्येक पालकमंत्र्यांनी काही निधी कापडी पिशवी बनविण्यासाठी बचतगटांना देण्याबाबत सांगितले आहे.
प्लास्टिक व थर्माकोल बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री जुही चावला यांच्यासह समाजाच्या विविध स्तरातील व्यक्तींनी, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी या निर्णयाचे स्वागत करुन सहकार्य दिल्याबद्दल श्री.कदम यांनी आभार मानले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती