कोविड रूग्णालयात उपचारानंतर 15 नागरिक बरे होऊन घरी

अमरावती, दि. 10 : येथील कोविड रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर बरे झाल्यामुळे 15 नागरिकांना घरी सोडण्यात आले.  रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला. ही बाब दिलासा देणारी ठरली असून, वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी  ब-या झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी ब-या झालेल्या रूग्णांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रूग्णसेवा देत आहेत. अमरावती महापालिका हद्दीतील 15 नागरिक आज बरे होऊन परतत आहेत, याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही बातमी दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. निकम यांनी व्यक्त केली.


यात 10 पुरुष व्यक्ती व 5 महिलांचा समावेश आहे. कमिला ग्राऊंड येथील तीन महिला व एक पुरुष अशा चौघांचा समावेश आहे. हैदरपुरा येथील 2 पुरुष व्यक्तींचा त्यात समावेश आहे. बडनेरा येथील एक पुरुष व एका महिलेचा अशा दोघांचा समावेश आहे. तारखेडा येथील तीन पुरुष व्यक्तींचा त्यात समावेश आहे. खोलापुरी गेट येथील 2 पुरुष व एका महिलेचा अशा तिघांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, चेतनदास बगिचा येथील एका पुरुष व्यक्तीचा समावेश आहे. 


रुग्णालयात सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचा-यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले. कुणाही नागरिकांनी कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसली की तत्काळ रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, अशी भावना या ब-या झालेल्या रूग्णांनी यावेळी व्यक्त केली.


उपचारादरम्यान रुग्णांनी वॉर्डातील सर्व स्टाफशी चांगले सहकार्य केले. स्वत:चे मनोधैर्य कायम ठेवले. आज ते बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.  या काळात नागरिकांनीही दक्षतेचे पालन करावे. कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कोविड रूग्णालयात सेवा देणा-या पारिचारिकांनी केले.

 

                                                                                         



                            000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती