Tuesday, May 5, 2020

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा अमरावती आकाशवाणीवर संवाद

 

विकासकामांना गती देण्यासह रोजगारनिर्मितीवर भर देणार महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 5 : एकीकडे कोरोना संकटाचा खंबीरपणे सामना करताना दुसरीकडे विकासचक्रालाही गती द्यायची आहे. त्यामुळे पुढील काळात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह रोजगारनिर्मितीवर भर देणार असल्याचे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे सांगितले.

            अमरावती आकाशवाणी केंद्रातर्फे हॅलो इन या कार्यक्रमात निवेदक संजय ठाकरे यांनी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांची मुलाखत घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना, अर्थचक्र गतिमान करण्यासाठीचे उपाय, नव्या विकासकामांचे नियोजन आदी विविध विषयांवर विस्तृतपणे व मनमोकळेपणे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी संवाद साधला.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात अधिकाधिक अद्ययावत आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. मेडिकल सुविधा अजून चांगल्या झाल्या पाहिजेत. आपण मध्य भारतात आहोत. चांगल्या सुविधा निर्माण झाल्या तर त्याचा फायदा महाराष्ट्रासह शेजारी राज्यातील व मध्य भारतातील नागरिकांना मिळेल. एमआयडीसी विकास, विमानतळ विकास याकडेही लक्ष पुरविण्यात येईल. विकासप्रक्रियेत काही अडथळे असतील, ते सर्वप्रथम दूर करण्यावर भर देण्यात येईल. आवश्यक ती सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू.

            पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, कोरोना संकटाचा विविध यंत्रणांकडून मुकाबला होत आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी सकारात्मकपणे कामे करावी लागतील. नकारात्मकता काढावीच लागेल. अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस हे जीवाची बाजी लावून काम करत आहेत. अनेकजण आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी मानसिक व्यवस्थापनाचा उपक्रम आखला. त्यांना भावनिक व मानसिकरीत्या दृढ, सकारात्मक करण्याचा हा हेतू आहे.

या व्यक्तींना आपल्या दहा दिवसांच्या ड्युटीनंतर  डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीत संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागते. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना ध्यानधारणेचे प्रशिक्षण दिले जात आहे. आपण स्वत: जाऊन या प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे. असे अनेक प्रयत्न होत आहेत. या काळात नागरिकांनी या काळात स्वयंशिस्त पाळली पाहिजे. अशी स्वयंशिस्त ही या काळापुरतीच नव्हे, तर जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. यापुढे आपल्याला ते अंगीकारावेच लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात लॅब सुरू करताना तिची उभारणी, परवानगी प्रक्रिया आदी अनेक बाबी पूर्ण करायच्या होत्या. याच काळात दुसरीकडे आरोग्य यंत्रणेकडून उपचार, तपासणी व सर्वेक्षणाची कामे व्यापक करत जाणे, संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठ्यात नियमितता ठेवणे अशी अनेक कामे सुरू आहेत. या संकटकाळात रोज नवे प्रश्न उभे राहत असतात. त्यांचे निराकरण करत असतानाच लॅबचेही काम पूर्णत्वास जाण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा केला. त्यामुळे हे काम पूर्णत्वास गेले. आता ही लॅब सुरू झाली असून, सोमवारपासून तिथून कोरोना चाचणी अहवाल मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासण्या, थ्रोट स्वॅब घेणे, आवश्यक ते क्षेत्र प्रतिबंधित करणे व इतर आवश्यक कामे या सगळ्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या सगळ्या प्रयत्नांतूनच कोरोना अमरावतीतून हद्दपार होईल, असा मला विश्वास आहे.

सकारात्मकतेनेच मोठमोठी कामेही यशस्वी होतात. त्यामुळे काम कितीही कठीण असले तरी सकारात्मक प्रयत्नांनीच यश मिळवता येते. त्यामुळे सकारात्मक दृष्टी ठेवूनच यापुढे खंबीरपणे काम करत राहणार, असेही त्यांनी सांगितले.

  अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव, कौंडण्यपूर येथील पालखी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य, आपल्याला मिळालेली प्रेरणा यावरही त्यांनी मुलाखतीतून प्रकाश टाकला. 

                                    000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...