आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश पावसाळा लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करावे - पालकमंत्री यशोमती ठाकूर


 

अमरावती, दि. 13 : आगामी पावसाळा लक्षात घेऊन खरीप नियोजनाबरोबरच इतरही तयारी आवश्यक आहे. पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य रोग उद्भवू शकतात, हे लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी. विशेषत: मेळघाट व दुर्गम भागावर विशेष लक्ष केंद्रित करावे. कोरोनाचा मुकाबला करत असतानाच ही तयारीही करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

            कोरोना संकटाशी लढत असताना इतर बाबतीतील आरोग्य सेवांमध्ये खंड पडू नये. आगामी पावसाळा लक्षात घेता आणि जिल्ह्यातील मेळघाट व दुर्गम परिसरात पावसाळ्यात उद्भवणारी स्थिती लक्षात घेता जूनपूर्वीच औषध साठा व इतर सुविधा पुरविण्यात याव्यात.  दरवर्षी मान्सूनपूर्व काळात करावयाच्या उपाययोजना कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अधिक प्रभावीपणे व दक्षतापूर्वक राबविल्या पाहिजेत. टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर अडकून पडलेल्या कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविणे व बाहेरून येणा-या नागरिकांची तपासणी, विलगीकरण आदी कार्यवाही काटेकोरपणे करावी. परदेशातूनही जिल्ह्यात नागरिक येत आहेत. त्यादृष्टीने दक्षतापूर्वक कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.   

        त्या पुढे म्हणाल्या की, पावसाळ्याच्या दृष्टीने मेळघाटवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कुपोषणाचा प्रश्न मेळघाटाला अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. त्यामुळे पाड्यापाड्यावर प्रशिक्षित आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्यसेवक यांची समन्वय यंत्रणा निर्माण करावी. धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने आताच सुविधांची तजवीज निर्माण करण्याच्या दृष्टीने हालचाली व्हाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

 पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, टाळेबंदीतील शिथिलीकरणानंतर यंत्रणांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आदींचा अवलंब होत नसल्यास कारवाई करून शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे. कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्राधान्याचे आव्हान आहे. ती सजगता ठेवून कामे करावीत. जिथे उद्योग- व्यवसायांना परवानगी देण्यात आली तिथे लक्ष केंद्रित करून अधिक काळजी घ्यावी.  

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, जिल्हा कोविड रूग्णालयातून उपचारानंतर बरे झाल्याने काल 24 व आज 11 रूग्णांना सुट्टी देण्यात आली.  त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या 56 वर जाऊन पोहोचली आहे. मोठ्या संख्येने रूग्ण बरे होऊन घरी परतत आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे. समाजात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना रुग्ण बरे होत आहेत. ही सकारात्मक बाब पुढे येत असल्याने भीतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. योग्य उपचार केल्यास व्यक्ती पूर्णपणे बरी होते. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही लक्षणे असतील तर घाबरून न जाता माहिती द्यावी व शासकीय दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत. योग्य दक्षतापालन, सकारात्मक प्रयत्न व सर्वांच्या सहकार्यातून आपला जिल्हा व देश निश्चित कोरोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

                       

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती