Wednesday, May 27, 2020

टोळधाड किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना जाहीर




किडीच्या नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना करा

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे कृषि विभागाला निर्देश

अमरावती, दि. 26 : अमरावती जिल्ह्यामध्ये टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही टोळधाड दूरवर उडत जात असल्याने तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदीचा फडशा पाडते. या किडीचा प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जिल्ह्यातील वरुड, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यावर कृषि विभागाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली तत्काळ उपाय करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. काल दि. 26 मे, रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वरुड तालुक्यातील काही गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पाहणी दौऱ्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, टोळधाड या किडीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यात वरुड, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यात टोळधाडीच्या आक्रमणाने शेतकरी चिंतीत झाले आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी पुढीलप्रमाणे कृषी विभागाकडून जाहिर केलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वरुड तालुक्यातील पाळा, उमरखेड, गव्हाणकुंड, हिवरखेड या गावांमधून टोळधाडीचा एक थवा स्थलांतरीत होतांना कृषी विभागाला आढळून आला आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अंतर्गत प्रामुख्याने टिनाचे डबे, ढोल वाजविणे, टॅक्टर व मोटर सायकलचा सायलेन्सर काढून शेतात मोठ्याने आवाज करुन किडीला हूसकावून लावावे. तसेच क्लोरोपायरीफॉस व मेल्यॉथिऑन या किटकनाशकाची फवारणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वरुड तालुक्यातील पुसला, खापरखेडा या शिवारात सायंकाळी या किडीचा थवा थांबलेला आढळल्याने त्यावर ट्रॅक्टर स्प्रेअर, अग्निशमन बंबच्या सहाय्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली फवारणी करण्यात आली. यामुळे सदर किडीचा थवा कमी होऊन पुढे नागपूर जिल्ह्याच्या सिमेवर गेल्याचे समजले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टोळधाडचा थवा आढळून आल्यास किंवा थांबलेला दिसल्यास वरीलप्रमाणे उपायांनी थवा हाकलून लावल्यानंतर पुढच्या गावांतील लोकांना सतर्क राहून त्यांना सुध्दा याप्रमाणे उपाययोजना करण्याबाबत सांगावे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर टोळधाड उंच झाडावर स्थिरावते, अशा स्थिरावलेल्या थव्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कळवून त्यांच्या देखरेखीखाली सामुहिक फवारणी अग्निशमन बंबाच्या सहाय्याने करावी. तसेच गावात ज्या  शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर स्प्रेअर, पॉवर स्प्रेअर, एचटीपी स्प्रेअर फवारणीचे विविध यंत्र उपलब्ध असल्यास त्यांनी फवारणीचे यंत्र सज्ज ठेवून फवारणीसाठी सहाय्य करावे.

ज्या शेतकऱ्याकडे भाजीपाला, फळपिक आहेत त्यांनी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या बेंडीओक 80 डब्लू. पी., क्लोरोपायरीफॉस 20 ईसी, 50 ईसी, डेल्टामॅथीन 2.8 युएलव्ही व 1.25 युएलव्ही, डायपलूबेंझुर 25 ईसी लॅम्ब्डा सायहॅलोथीन 25 ईसी व 10 डब्लू पी, मॅलॉथिऑन 50 ईसी व 25 ईसी व 95 युएलव्ही किटकनाशकांची, औषधाची फवारणी करण्याचे सुचविण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. परंतू सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...