Sunday, May 24, 2020

कंटेनमेंट झोनमध्ये रक्तदाब, मधुमेह असणा-या रुग्णांच्या याद्या करून औषधे पुरवावीत - जिल्हाधिकारी शैलेश नवाल




अमरावती, दि. 24 : अनेक वर्षांपासून रक्तदाब, मधुमेह असणा-या नागरिकांच्या याद्या करून त्यांना औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महापालिका आयुक्त, तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.  

श्री. नवाल यांनी आज विविध विलगीकरण कक्षांना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शासनाच्या निर्देशानुसार, कंटेनमेंट झोनमधील 15 वर्षांपेक्षा जास्त किंवा उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार असलेल्या नागरिकांच्या याद्या तयार करून त्यांना औषधे उपलब्ध करून द्यावीत, रोगसूचक रूग्ण (लक्षणे आढळणारा) आढळल्यास त्यांच्या एक्स रेसाठी त्यांना सामान्य रूग्णालय किंवा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात यावे, शासनाच्या सूचनेनुसार, ज्या रूग्णाला पाच दिवसांपेक्षा जास्त ताप असेल त्यांचे स्वॅब घ्यावे आणि त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी दिले.

            इंजिनिअरिंग कॉलेज व रॉयल पॅलेस मंगल कार्यालयात बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात रुग्‍णाच्‍या  संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींना ठेवण्‍यात आले आहे. तिथे जिल्हाधिकारी यांनी भेट दिली व पाहणी केली. यावेळी त्यांनी तिथे नियुक्त  महापालिकेच्या आरोग्य पथकाशी चर्चाही केली.   

                   यावेळी क्वारंटाईन कक्षातील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. जिल्‍हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, लक्षणे आढळताच तातडीने तपासणी करून घेणे आवश्यक असते. हा आजार योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. जिल्हा प्रशासन तुमच्यासोबत आहे. माहिती देण्यासाठी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

महापालिका प्रशासनाकडून डोअर टू डोअर जाऊन सर्दी, खोकला व ताप असलेल्या रुग्णांची माहिती घेतली जात आहे. त्यांना सहकार्य करुन आपले व आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे नुकसान होण्यापासून वाचवावे. आपण सर्वांनी मिळून कोरोनाविरोधात यशस्वी लढा देऊ. आपण सहयोगानेच ही लढाई जिंकता येईल, असेही ते म्हणाले.     

मौजा तारखेडा येथील दवाखान्‍यालाही त्यांनी भेट दिली व तेथील इमारत वापरात आणण्यासाठी प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले. यावेळी परिसरातील काही नागरिकांना मास्कचे वाटपही करण्यात आले.

                                    000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...