गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते दिव्यांग मानसकन्येचा हृद्य सत्कार



गृहमंत्र्यांच्या पुढाकाराने झाले होते 2004 मध्ये लग्न

 

अमरावती, दि. 28 : वझ्झर येथील दिव्यांग, बेवारस बाल गृहातील एका दिव्यांग भगिनीची जबाबदारी स्वीकारून तिचे लग्न गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने झाले. संसारात सुखी झालेल्या या आपल्या दिव्यांग मानस कन्येचा व जावयाचा हृद्य सत्कार गृह मंत्री यांनी आज अमरावतीत केला. या हृद्य सोहळ्यात उपस्थित सर्वजण यावेळी भारावून गेले होते. 

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य बेघर बेवारस दिव्यांग बालगृहात सुशीला ही मुलगी आजीवन पुनर्वसनासाठी दोन वर्षांची असल्यापासून दाखल आहे. ती पुण्याला रेल्वे स्थानकावर सापडली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर यांनी या बालिकेला वझ्झरच्या आश्रमात आणून दाखल केले व तिचा सांभाळ केला. ती शिक्षित होऊन २१ वर्षांची होताच शंकरबाबा पापळकर यांनी तिचा विवाह वलगाव येथील दिव्यचक्षू अशोक देशमुख यांच्याशी निश्चित केला.

गृह मंत्री अनिल देशमुख यांनी या विवाहासाठी पुढाकार घेतला व अमरावती येथे झालेल्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून आपली मानसकन्या व जावयाला आशीर्वाद दिला. दि. 30 जून 2004 रोजी हा विवाह संपन्न झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी कुंदन कौशिक व पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी त्यावेळी कन्यादानात सहभाग घेतला होता.

गृह मंत्री श्री. देशमुख हे आज बैठकीनिमित्त अमरावतीत आले असताना त्यांनी शंकरबाबा पापळकर यांच्याशी चर्चा करताना आपल्या मानसकन्येची व जावयाची चौकशी केली. त्यावर आपण उभयतांना प्रत्यक्ष भेट घेऊन आशीर्वाद देण्याची शंकर बाबांनी विनंती केली. त्यानुसार आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग सुशीला व अशोक देशमुख आले. गृह मंत्र्यांनी साडी चोळी व कपडे देऊन आपल्या जावयाचा व लेकीचा सन्मान केला व आशीर्वाद दिला. या संवेदनशील सोहळ्यात उपस्थित सगळेच भारावून गेले होते.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती