‘पीडीएमसी’ लॅबची यंत्रणा इन्स्टॉल; लवकरच होणार चाचण्यांना सुरुवात

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा


 

अमरावती, दि. 16 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापाठोपाठ आता डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतही कोरोना चाचण्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी तत्काळ उपाययोजनेची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या लॅबसाठी जिल्हा नियोजन निधीतून 50 लाख रूपयांचा निधी मिळवून दिला असून, लॅबसाठीची आवश्यक यंत्रणा इन्स्टॉल करण्यात आली आहे.   

कोरोना प्रतिबंधासाठी रूग्णांचे तपासणी तत्काळ मिळणे खूप गरजेचे आहे. अमरावती येथे लॅब नसल्यामुळे येथील संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर, अकोला, वर्धा येथे पाठविण्यात येत होते. ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी पाठपुरावा करून तत्काळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेसाठी निधी मिळवून दिला. अमरावतीत दोन लॅब झाल्यास उपाययोजनांना गती येईल, हे लक्षात घेऊन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून लॉगिन आयडीची तांत्रिक अडचणही तत्काळ दूर केली.

त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील लॅब  यापूर्वीच सुरु झाली असून, त्यांचे अहवाल मिळण्यास सुरुवातही झाली आहे.   पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी लॅब सुरू होण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न केले. ही लॅब कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात स्थापित झाली आहे. आवश्यक तपासण्याकरिता मशीन सुद्धा प्राप्त झाल्या होत्या. त्यासाठी मान्यता आयुर्विज्ञान संस्थानतर्फे प्राप्त झाली. बायोसेफ्टी गाईडलाईन्स व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोविड-19 करिता असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार लॅबला मान्यता प्रदान झाली. त्यानुसार या लॅबकडून रोज अहवाल प्राप्त होऊन संबंधितांवर उपचार, संपर्कातील व्यक्तींचा शोध व स्वॅब मिळवून चाचणी करणे आदी सर्व प्रक्रियेला गती मिळाली आहे.

            दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबॉयालॉजी विभागातर्फे प्रस्तावित लॅबही सुरु व्हावी यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. जिल्हा नियोजनातून तत्काळ 50 लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यानुसार चाचणीसाठीची आवश्यक यंत्रसामग्री मिळविण्यात आली आहे. सदर यंत्रसामग्री इन्स्टॉल करण्यात आली आहे. आयसीएमआरकडून त्याबाबत ऑनलाईन निरीक्षण करण्यात येईल व त्यानुसार मान्यता लवकरच प्राप्त होईल. त्यासाठीच्या आवश्यक तरतुदींची पूर्तता करण्यात येत आहे. लवकरच ही मान्यता प्राप्त होईल व लॅब पूर्णपणे कार्यान्वित होईल. लॅबमध्ये चार तज्ज्ञ व सहा तंत्रज्ञ आहे. त्यांचे प्रशिक्षण झाले आहे. त्याशिवाय, इतर पाच मदतनीसांचा स्टाफ आहे. तीन पाळ्यांमध्ये ही यंत्रणा काम करेल. दर दिवशी साधारणत: 96 अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी दिली.

 

 

            लॅब पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी ज्या बाबींची पूर्तता करावयाची आहे, त्याबाबत गतीने कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे लवकरच ‘पीडीएमसी’च्या लॅबमधूनही अहवाल मिळू लागतील. कोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांसाठी चाचण्या करून निदान करण्याची सुविधाही या लॅबमधून मिळणार आहे. ही कायमस्वरूपी तरतूद असून, ही अद्ययावत सुविधा अमरावतीसाठी मोठी उपलब्धी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागपूरसारख्या शहरात चार लॅब आहेत. त्यामुळे अमरावतीसारख्या विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी दोन लॅब तरी असाव्यात, ही भूमिका घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दोन्ही लॅबच्या प्रस्तावांचा सकारात्मकपणे पाठपुरावा केला.  त्यामुळे कोरोना चाचणी लवकर प्राप्त होतील. त्यानंतरही कुठे आवश्यकता भासल्यास पुन:तपासण्या करून त्याचेही अहवाल स्थानिक स्तरावरच सुविधा असल्याने लवकर प्राप्त करून घेता येतील व प्रत्येक बाबीची वेळेत खातरजमा करून उपाय करणे शक्य होईल. स्थानिक स्तरावर या सुविधा निर्माण झाल्यामुळे संसर्गजन्य आजारांबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती मिळणार आहे. 

 

00000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती